
MCA निवडणुकीत ‘कूलिंग-ऑफ’ नियमांवरून वाद (Photo Credit - X)
MCA Election 2025: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित निवडणुकीपूर्वी ‘कूलिंग-ऑफ’ (Cooling-Off) कालावधीच्या नियमांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काही विद्यमान पदाधिकारी तीन वर्षांचा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी पूर्ण न करता पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे MCA च्या संविधानाचे पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे.
MCA चे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांना या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची लेखी विनंती केली आहे. तब्बल ५० सदस्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
संजय नाईक यांनी स्पष्ट केले की, MCA संविधानानुसार, सलग दोन टर्म (एकूण सहा वर्षे) पदावर राहिल्यानंतर, संबंधित पदाधिकाऱ्याला पुढील तीन वर्षे निवडणूक लढवता येत नाही. हा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तथापि, काही विद्यमान पदाधिकारी या नियमाचे सर्रास उल्लंघन करून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही MCA अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवा-तपशीलांमध्ये फेरफार केले आहेत. तसेच, त्यांनी निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांना बीसीसीआय (BCCI) निवडणूक प्रक्रियांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत, जे MCA संविधान आणि नियमांविरुद्ध आहे.
MCA पदाधिकारी आणि उच्च अधिकाऱ्यांसह जवळपास पन्नास ते साठ सदस्यांनी एकत्र येत निवडणूक अधिकाऱ्यांना MCA संविधानाचे पावित्र्य राखण्याचे आणि त्याचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या संदर्भात MCA लोकपाल आदेश आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देखील पत्रासोबत जोडला आहे. या वादामुळे १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या MCA निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.