Kedar Jadhav Latest News,
मुंबई: आजवर अनेक खेळाडूंनी खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. यात काहींना यश मिळालं तर काहीना अपयश. अशातच आज पुण्यातील माजी क्रिकेटपटूने खेळाच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात उडी मारली आहे. पुण्यातील माजी क्रिकेटपटू केदार जाधव Kedar Jadhav आज भारतीय जनता पक्षात प्रवेश कऱणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करेल.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधवने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार तसेच रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्याच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती. केदार जाधव हा मूळचा पुण्याचा रहिवासी आहे. क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात उतरत आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्याचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
केदार जाधव यांचा जन्म २६ मार्च १९८५ रोजी पुणे येथे महादेव आणि मंदाकिनी जाधव यांच्या घरी झाला. त्यांचं कुटुंब मूळचं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या जाधववाडी गावचं होतं. १९८० च्या दशकात जाधव कुटुंबाने पुण्याकडे स्थलांतर केलं.
वडील महादेव जाधव हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळात लिपिक म्हणून कार्यरत होते. केदार हा चार भावंडांमध्ये सर्वात धाकटा. त्याच्या तीन मोठ्या बहिणी अभ्यासात अगदी हुषार होत्या, मात्र केदारचं शिक्षणात फारसं लक्ष नव्हतं. त्याचा ओढा लहानपणापासूनच क्रिकेटकडे होता. त्यामुळे नववीपर्यंत शिक्षण घेतल्यावर त्याने शाळा सोडून पूर्णवेळ क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला.
क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर २००४मध्ये केदार जाधवला महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळालं. सुरुवातीला केरळविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याने थेट १९५ धावांची जबरदस्त खेळी साकारली आणि आपल्या आगमनाची ठसठशीत नोंद केली.
मात्र, त्याच्या पारंपरिक फलंदाजी शैलीमुळे आणि संघात कायमस्वरूपी स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेला ठोस पाठिंबा न मिळाल्यामुळे, केदारला महाराष्ट्रासाठी नियमित खेळाडू होण्यासाठी संघर्ष करावा लागला. २००७ च्या हंगामात त्याने प्रथमच वरिष्ठ गटातील क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी तो मुख्यतः खालच्या मधल्या फळीतील फलंदाज म्हणून वापरला जायचा, त्यामुळे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वेळ लागला.
घरगुती क्रिकेटमधील अपूर्व कामगिरीमुळे, बीसीसीआयने त्याच्याकडे लक्ष दिलं आणि २०१४ मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली, पण त्याला खेळायला संधी मिळाली नाही. त्यानंतर, श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात त्याने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र, त्या सामन्यात त्याचा दिवस फारसा विशेष ठरला नाही – तो फक्त २० धावा करून बाद झाला.
पण जाधवने हार मानली नाही. त्याने सातत्याने मेहनत घेतली आणि जेव्हा खरी संधी मिळाली, तेव्हा ती दोन्ही हातांनी पकडली. २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध पुण्यात झालेल्या वनडे सामन्यात, त्याने ७६ चेंडूत १२० धावा करत विराट कोहलीसोबत २०० धावांची भागीदारी केली. त्या सामन्यात, त्याच्या खेळीने सामना फिरवला आणि भारताचा विजय निश्चित केला. या खेळीत केदार जाधवने धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीलाही मागे टाकलं होतं