
मल्लखांब, बॉक्सिंगसह पाच क्रीडा स्पर्धा
मल्लखांब, बॉक्सिंग, डर्ट ट्रॅक, पिकलबॉल आणि गोल्फ या क्रीडा स्पर्धांचा यात समावेश असून, सर्व स्पर्धांना प्रवेश विनामूल्य आहे. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सरचिटणीस व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई आणि विश्वस्त मोहन टिल्लू यांनी याबाबत माहिती दिली.पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुरेश कलमाडी यांनी देशात क्रीडा संस्कृती रुजावी, या उद्देशाने या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन दिले. याच परंपरेनुसार यंदाही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मल्लखांब स्पर्धा १९ व २० सप्टेंबरला टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे होणार असून, त्यात ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. गोळीबार मैदानावर होणाऱ्या डर्ट ट्रॅक स्पर्धेत १५० हून अधिक मुले-मुली सहभागी होणार आहेत. भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये बॉक्सिंग स्पर्धा होणार असून, त्यात १४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.उंड्रीतील मसलबार स्पोर्ट्स क्लब येथे २० सप्टेंबरला पिकलबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून, विजेत्यांना एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच २४ सप्टेंबरला पूना क्लब गोल्फ कोर्स येथे गोल्फ स्पर्धा होणार आहे.
Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार! बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची विजयी आगेकूच
बालगंधर्व कलादालनातही विविध कलाविष्कारांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १७ सप्टेंबरला ५० हून अधिक सुलेखनकारांच्या २०० हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. १९ व २० सप्टेंबरला पत्रकार छायाचित्रकारांनी वर्षभरात टिपलेल्या सुमारे २५० छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येणार आहे. २१ व २२ सप्टेंबरला ८० हून अधिक व्यंगचित्रकारांची २०० पेक्षा अधिक व्यंगचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. तर २३ व २४ सप्टेंबरला पद्मविभूषण सतीश गुजराल यांच्या कलाशैलीवर आधारित चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय १९ सप्टेंबरला ‘पुण्याचा पर्यटन विकास’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.
Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी
पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार भवन येथे १५ सप्टेंबरला ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, १६ सप्टेंबरला ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १७ सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्या ७५व्या वर्षानिमित्त, तर बालभारतीच्या ६०व्या वर्षानिमित्त हा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये क्रीडा, कला, साहित्य आणि संस्कृतीसोबत विविध क्षेत्रांतील योगदानाचा गौरवही अनुभवता येणार आहे.