
हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणाऱ्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कर्णधार म्हणून तिने अनेक चढ-उतार अनुभवले, कठीण निर्णय घेतले आणि संघाला नेहमीच वैयक्तिक कामगिरीपेक्षा प्राधान्य दिले. आता भारतीय महिला संघाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत हरमनप्रीतने आपल्या कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या अध्यायाला पूर्णविराम दिला आहे. मात्र, ‘कर्णधारपद संपले, प्रवास सुरूच राहील’, असे सांगत तिने खेळाडू म्हणून भारतीय क्रिकेटसाठी योगदान सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये हरमनप्रीत कौरने नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर हरमनप्रीतने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
हरमनप्रीतने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या निर्णयाची माहिती दिली. तिने म्हटले की, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय सोपा नव्हता. कर्णधार म्हणून अनुभवलेल्या आठवणी, भावना आणि केलेले त्याग आयुष्यभर आपल्यासोबत राहतील, असे तिने नमूद केले.
हरमनप्रीतने आपल्या पोस्टमध्ये संघासाठी केलेल्या त्यागाचाही उल्लेख केला. भारतीय महिला क्रिकेटसाठी आपले रक्त, घाम आणि वेळ दिल्याचे तिने म्हटले. अनेकदा वैयक्तिक कामगिरी आणि स्वतःच्या प्रगतीपेक्षा संघाला प्राधान्य दिले, कारण आपल्यासाठी संघ नेहमीच प्रथम होता, अशी भावना तिने व्यक्त केली.
कर्णधार म्हणून अनेक कठीण निर्णय घ्यावे लागल्याचे हरमनप्रीतने म्हटले आहे. प्रत्येक निर्णय सर्वांना समजेल किंवा मान्य होईलच असे नव्हते. काही निर्णयांमुळे वैयक्तिक नुकसानही झाले. मात्र, प्रत्येक निर्णयामागे संघाला अधिक मजबूत करणे, इतर खेळाडूंना पुढे जाण्याची संधी देणे आणि त्यांच्यावर विश्वास दाखवणे हाच उद्देश होता, असे तिने स्पष्ट केले.
कर्णधारपद सोडताना आपण भावुक असलो तरी मनातून शांत असल्याचे हरमनप्रीतने म्हटले आहे. तिने आपल्या सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापन, बीसीसीआय आणि कुटुंबीयांचे आभार मानले. पोस्टच्या शेवटी तिने ‘कर्णधारपदाचा अध्याय संपला आहे, पण प्रवास सुरूच राहील’, असा संदेश देत खेळाडू म्हणून भारतीय संघासोबतचा प्रवास सुरू राहणार असल्याचे संकेत दिले.