
ICC Rankings: Virat Kohli's big leap! Rohit Sharma retains top spot; 'This' Pakistani player also has a big achievement
ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून पुरुष खेळाडूंची ताजी क्रमवारीत जाहीर करण्यात आली. यामध्ये भारताचा स्टार विराट कोहलीने एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. कोहलीला एका स्थानाचा फायदा होऊन तो आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे आणि आता तो नंबर १ फलंदाज होण्यापासून फक्त ३२ रेटिंग गुण दूर आहे. ७५१ गुणांवर असताना कोहलीने रांची एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३५ धावांची तडफदार खेळी साकारली होती. दरम्यान, दुखापतीमुळे शुभमन गिलला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या, रोहित शर्माने ७८३ गुणांसह एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आपला दबदबा कायम राखला आहे.
हेही वाचा : IND VS SA : ‘गौतम गंभीर सर्वोत्तम प्रशिक्षक…’अफगाणिस्तानच्या ‘या’ स्टार खेळाडूने उधळली स्तुतीसुमने
बाबर आझमने एप्रिल २०२१ मध्ये कोहलीला मागे टाकत एकदिवसीय सामन्यांमध्ये अव्वल स्थान काबिज केले होते. तेव्हापासून विराट कोहलीला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येतं आलेले नाही. दरम्यान, रोहित शर्माने दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानला पिछाडीवर सोडले आहे. रोहितने रांची वनडेमध्ये अर्धशतक झळकावून आपला फॉर्म दाखवून दिला. गोलंदाजी क्रमवारीत भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. पहिल्या वनडेमध्ये चार विकेट घेत कुलदीप यादवला एका स्थानाचा फायदा होऊन तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
टी-२० रँकिंगमध्ये पाकिस्तानच्या सैम अयुबने आपला दबदबा दाखवून दिला आहे.त्याने पुन्हा एकदा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडूचा क्रमांक पटकावला आहे. २९५ गुणांसह अयुबने झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला पिछाडीवर टाकत पहिला नंबर काबिज केला आहे. रावळपिंडी येथे नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत अयुबने शानदार प्रदर्शन केले. पाकिस्तानचा अबरार अहमदला देखील गोलंदाजी क्रमवारीत चार स्थानांचा फायदा होऊन तो चौथ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे, तर मोहम्मद नवाज ११ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. तसेच, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये नवाज तीन स्थानांनी वर सरकून चौथ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.
भारताविरुद्ध मालिका गमावल्यानंतर देखील दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी कसोटी क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केल्याचे दिसून येत आहे. मार्को जॅन्सनने ८३५ गुणांसह कसोटी गोलंदाजांच्या यादीत पाच स्थानांवर झेप घेतली आहे, जे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे. फिरकी गोलंदाज सायमन हार्मरने देखील १३ स्थानांनी झेप घेऊन ११ व्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच फलंदाजी खेळाडूंमध्येही सुधारणा दिसून आली, ज्यामध्ये काइल व्हेरेन, रायन रिकेलटन आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश आहे. भारतासाठी, जसप्रीत बुमराह ८७९ गुणांसह कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.