
भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वीच, आयसीसीने आपली नवीन आणि अद्ययावत क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा इशान किशन आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ८७६ वर पोहोचले असून, ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च क्रमवारी आहे. तो पहिल्यांदाच क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी तो दुसऱ्या स्थानावर होता, आता त्याने एक स्थान वर झेप घेतली आहे.
दरम्यान, अभिषेक शर्मा एका स्थानाने घसरून पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग ८६९ पर्यंत खाली आले आहे. परंतु, ईशान आणि अभिषेक यांच्या रँकिंग आणि रेटिंगमध्ये फारसा फरक नाही, त्यामुळे पाच सामन्यांच्या इंग्लंड टी२० मालिकेत हे दोन्ही फलंदाज सहभागी झाल्यावर यात पुन्हा बदल होऊ शकतो.
A changing of the guard at the top of the ICC Men’s T20I Batter Rankings, with further movement in the Test charts following a big week of #WTC27 action 😲 Details 👇https://t.co/KoXIJ9DBFk — ICC (@ICC) July 1, 2026
भारतीय संघातून वगळण्यात आलेला सूर्यकुमार यादव एका स्थानाने घसरला आहे. तो पूर्वी सातव्या क्रमांकावर होता, पण आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाने सूर्याशिवाय दोन सामने खेळल्यामुळे त्याचे रेटिंग घसरले आहे. याचा फायदा जॉस बटलरला झाला असून, तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जॉस बटलरचे रेटिंग ७१६ आहे, तर सूर्याचे ७०८ आहे. टी२० क्रमवारीत अव्वल १० मधील उर्वरित खेळाडूंचे स्थान कायम आहे.
आता भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिकेला आज सुरूवात होणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय आणि इंग्लिश खेळाडूंच्या कामगिरीवर पुन्हा एकदा त्यांची क्रमवारी अवलंबून असेल, जी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.