फोटो सौजन्य - X
नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत पार पडली, ज्यात भारताने ३-० असा एकतर्फी विजय प्राप्त केला. या मालिकेदरम्यान दिल्ली पोलिसांच्या एका धडक कारवाईने सर्वांचे लक्ष वेधले असून क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे यश त्यांच्या हाती लागले आहे. अरुण जेटली स्टेडियमच्या परिसरात अनधिकृतपणे तिकिटांची विक्री केल्याबाबत दिल्ली पोलिसांनी तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेदरम्यान तीन दिवसांपर्यंत पोलिसांनी एक विशेष मोहिम राबवली. या मोहिमेचे उद्दीष्ट तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणे होते. याप्रकरणी आतापर्यंत एकूण १३ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. कारवाईत अटक करण्यात आलेल्या १९ आरोपींकडे क्रिकेट सामन्यांचे ७१ तिकिटे व ७ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी स्टेडियम परिसरात जाळं पसरले होते. तसेच डिकॉय म्हणजेच नकली ग्राहक बनत हा तिकिटांचा काळाबाजार त्यांनी जनतेसमोर आणला. खासकरून दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, एमजी मार्ग, बीएसझेड मार्ग आणि जेपीएन पार्कसमवेत स्टेडियमच्या जवळच्या परिसरातील संशयास्पद व्यक्तींची चौकशी वाढवण्यात आली होती. या मालिकेचे तीनही सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्येच पार पडले होते.
IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आरोपी कमी किंमतीत तिकिट मिळवून ही तिकिटे क्रिकेट सामना पाहण्यास येणाऱ्या क्रिकेटप्रेमींना चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात होते. साधारणपणे अधिकृत वेबसाइटवरील तिकिटांची विक्री पूर्ण झाल्यानंतर सामना पाहण्यासाठी येणारे क्रिकेटप्रेमी कोणत्याही किंमतीत तिकिट विक्री घेण्यास तयार होतात. हाच फायदा घेत काळाबाजार करणाऱ्या टोळीने तिकिटांचे भाव अव्वाच्या सव्वा ठेवला होता. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी १३ सप्टेंबर, १५ सप्टेंबर व १७ सप्टेंबर असे तीन दिवस मोहिम चालवली व या टोळीचा पर्दाफाश केला.
पहिल्या सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच १४ सप्टेंबरला चार एफआयआर दाखल झाल्या, ज्यात पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २९ तिकिटे व ३ हजार ४०० रुपये प्राप्त करण्यात आले. तर दुसऱ्या सामन्याच्या वेळी सहा एफआयआर दाखल करत १० जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३१ तिकिटे व चार हजार रुपये पोलिसांना आढळले. तसेच १७ सप्टेंबरला तीन एफआयआरमध्ये चार आरोपींकडून ११ तिकिटे जप्त करण्यात आली.
या सर्व प्रकरणी दिल्ली प्रिवेंशन ऑफ टाउंटिंग अॅण्ड मॅलप्रॅक्टिसेस अगेंस्ट टूरिस्ट्स अॅक्ट, २०१० च्या कलमांतर्गत ४(सी) कारवाई करण्यात आली.
IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली






