IND vs BAN हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? (Photo Credit- X)
IND vs BAN, Asia Cup 2025: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील पुढील लढत भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना २४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार असून, जो संघ हा सामना जिंकेल, त्याची अंतिम फेरीतील जागा जवळपास निश्चित होईल. विजयाच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील, मात्र हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार कोणत्या संघाचे पारडे जड आहे, यावर एक नजर टाकूया.
आशिया कप २०२५ टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला जात आहे. या फॉरमॅटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील आमने-सामनेच्या विक्रमावर नजर टाकल्यास दोन्ही संघ आतापर्यंत १७ वेळा भिडले आहेत. या १७ सामन्यांपैकी फक्त एकदाच बांगलादेशने भारतावर विजय मिळवला आहे, तर उर्वरित १६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. बांगलादेशने एकमेव विजय २०१९ मध्ये मिळवला होता. याव्यतिरिक्त, गेल्या सहा सामन्यांवर नजर टाकल्यास, भारतीय संघाने ते सर्व जिंकले आहेत. त्यामुळे या बाबतीतही भारत बांगलादेशच्या खूप पुढे आहे.
टी-२० आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघ फक्त दोनदा आमने-सामने आले आहेत. २०१६ च्या आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये लढत झाली होती आणि दोन्ही सामने भारताने जिंकले होते. टी-२० विश्वचषकातही भारत आणि बांगलादेश तीन वेळा भिडले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली आहे. त्यामुळे कागदोपत्री आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, भारताने बांगलादेशवर वर्चस्व गाजवले आहे.
IND VS BAN : BCCI कडून बांगलादेश दौरा रद्द! ‘या’ वर्षापर्यंत टी-२० आणि वनडे मालिका खेळण्यास मनाई..
आशिया कप २०२५ मधील दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, टीम इंडियाने सुपर-४ फेरीच्या गट टप्प्यात चार सामने खेळले आहेत. या चारही सामन्यांमध्ये भारताने अपराजित राहून विजय मिळवला आहे. दुसरीकडे, बांगलादेशनेही चार सामने खेळले आहेत, परंतु त्यांना ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे फॉर्ममध्येही भारताचे पारडे जड आहे.
टीम इंडिया: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
बांगलादेश: सैफ हसन, तंजीद हसन तमीम, लिटन दास (कर्णधार आणि यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, शमीम हुसैन, जेकर अली, महेदी हसन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.