IND vs ENG 4th Test: Injured Rishabh Pant's historic scare; Becomes the first Indian player to score the most runs in WTC
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. हा सामना खूपच रंजक आणि अनेक घटनांनी भरलेला दिसत आहे.प्रथम फलंदाजी करत भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेऊन भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सर्वात चर्चेत राहिला आहे. पहिल्या डावात दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेलेला पंत दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात आला आणि त्याने अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे.
गुरुवारी (२४ जुलै) ऋषभ पंतने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनून विक्रमी कामगिरी केली आहे. ऋषभ पंतने भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माचा २७१६ धावांचा विक्रम मोडीत काढून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
ऋषभ पंतला रोहितचा विक्रम मोडण्यासाठी चौथ्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात केवळ ४० धावांची आवश्यकता होती. त्याने ओल्ड ट्रॅफर्ड येथे दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रात हा विक्रम आपल्या नावे केला. मँचेस्टरमध्ये ऋषभ पंत भारतासाठी ३८ वा जागतिक कसोटी अजिंक्यपद सामना खेळ आहे. या डावखुऱ्या विकेटकीपर-फलंदाजाच्या नावावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सहा शतके आणि १६ अर्धशतके जमा आहेत.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर समाप्त; बेन स्टोक्सकडून विकेट्सचा पंजा..
पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात पंत ४८ चेंडूत ३७ धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली होती. परंतु, भारताच्या पहिल्या डावातील १०२ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुल ठाकूर बाद झाल्यानंतर, पंत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात आला आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ५४ धावांवर असताना माघारी परतला. त्याला जोफ्रा आर्चरने आपली शिकार बनवले.
जर पंतने या डावात ६४ धावांचा टप्पा पार केला असता तर, तो इंग्लंडमध्ये १००० कसोटी धावा करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला असता. त्याच वेळी, आता पंतला १००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ १० धावांची आवश्यकता आहे. जर पंत पुढच्या डावात १० धावा करू शकला तर तो इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध १००० धावा पूर्ण करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरणार आहे. पंत आता सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि केएल राहुल यांच्या यादीत सामीलझाला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या भारताने ३५८ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेऊन भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले आहे.