फोटो सौजन्य- X
ड्युनिथ वेलालगेच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव करत 2-0 अशी मालिका जिंकली. या मालिका पराभवामुळे भारतावर तब्बल 27 वर्षांनी श्रीलंकेमध्ये मालिका पराभवाची नामुष्की ओढवली आहे. या आधी भारताने 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली होती. त्यावेळी अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने 1997 मध्ये भारताचा शेवटचा 3-0 असा पराभव केला होता. तेव्हापासून भारताने सलग 11 वेळा एकदिवसीय मालिका जिंकली होती, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा विक्रम कायम राखू शकला नाही.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ २६.१ षटकांत १३८ धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने 102 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या, तर कुसल मेंडिसने 59 धावांची खेळी केली. गोलंदाजीत, फिरकीपटू ड्युनिथ वेलालगेने चमकदार कामगिरी करत 5.1 षटकात 27 धावांत पाच बळी घेतले. त्याचवेळी महेश तिक्शिना आणि जेफ्री वांडरसे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 35 धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदर 30 धावा करून बाद झाला आणि विराट कोहली 20 धावा करून बाद झाला.
या मालिकेमध्ये पहिला सामना अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा श्रीलंकेने 32 धावांनी पराभव केला. आजच्या अखेरच्या सामन्यामध्ये तर श्रीलंकेने भारताला जबरदस्त शिकस्त देत 110 धावांनी पराभव केला. या एकदिवसीय मालिकासोबतच भारताचा श्रीलंका दौरा संपला आहे. या दौऱ्यावर भारताने टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली होती.
T20 विश्वविजेतेपदानंतर भारताचा हा पहिला दौरा होता. या दौऱ्या आधी गौतम गंभीर यांना प्रशिक्षक बनविण्यात आले होते. मात्र भारताला गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनामध्ये एकदिवसीय मालिकेमध्ये सपशेल पराभव झाला.