फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्या इंनिगमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला सर्वबाद करुन भारताचा संघ मागील दोन दिवसांपासून फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया आघाडीवर आहे आणि तिसऱ्या दिवशी कसोटी सामना संपण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजला १६२ धावांवर गुंडाळल्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने ५ विकेट गमावून ४४८ धावा केल्या आहेत. या काळात केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. टीम इंडियाकडे २८६ धावांची आघाडी आहे.
जरी भारताने वेस्ट इंडिजला डावाच्या फरकाने हरवले तरी त्यांना WTC पॉइंट्स टेबलमध्ये या विजयाचा फायदा होणार नाही. भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे आणि या विजयानंतरही तिसऱ्या स्थानावर राहील. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या ४६.६७ टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या दोन स्थानांवर भारताच्या वर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आहेत, ज्यांचे गुण अनुक्रमे १०० आणि ६६.६७ टक्के आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर भारताचा विजयाचा टक्का वाढेल, परंतु त्यांचे स्थान तेच राहील.
जर टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला तर त्यांचा विजयाचा टक्का ४६.६७ टक्क्यांवरून ५५.५६ टक्के होईल, परंतु तरीही ते श्रीलंकेपेक्षा कमी राहतील आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर राहील. जरी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना किंवा मालिका जिंकली तरी ते तिसऱ्या स्थानावर राहील. या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव केल्यानंतरही, भारताचा विजयाचा टक्का कमाल ६१.९१ पर्यंत पोहोचू शकतो आणि तरीही, तो श्रीलंकेच्या मागे राहील. जर श्रीलंकेने आगामी मालिकेत एकही सामना गमावला तर भारताला त्याचा फायदा होऊ शकतो.