आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून आशिया कप क्रिकेट सामन्यांकडे पहिले जाते. यंदाची आशिया कप स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार असून त्याकरता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघ जाहीर केला आहे. यात दुखापतींमुळे अनेक खेळाडूंना आशिया कप मधील सामान्यांना मुकावे लागणार असून तर बरेच अनुभवी खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मा याच्याकडे सोपवण्यात आली असून केएल राहुल याची उप कर्णधार पदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील.
आशिया कपसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
तर राखीव खेळाडू – दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
या अनुभवी खेळाडूंना डच्चू
भारतीय संघाचा विचार करता यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आल्याचे पाहावयास मिळते आहे. ज्यामध्ये सलामीवीर शिखऱ धवन, गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. शिखर मागील काही काळापासून फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येहील त्याने चांगली कामगिरी केली. पण तरीही त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसल्याचे दिसून आले आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे. तसंच ईशान किशन, संजू सॅमसन या युवांनाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे.