
photo- social media
सामन्याच्या सुरुवातीला अनुभवी जोकोविचने आपला दबदबा कायम ठेवत पहिले दोन सेट सहज जिंकले. त्याच्या अचूक सर्व्हिस आणि दमदार रिटर्नसमोर फोन्सेका संघर्ष करताना दिसत होता. पण तिसऱ्या सेटपासून या ब्राझिलियन युवा खेळाडूने आक्रमक रणनीती अवलंबली. बेसलाइनवरून मारलेले जोरदार फटके, निर्णायक क्षणी केलेल्या दमदार सर्व्हिस यामुळे त्याने जोकोविचला बचावात्मक खेळण्यास भाग पाडले. सामन्याची आकडेवारी पाहता, जोकोविचने ७० विनर्स मारले, तर फोन्सेकाने ६८ विनर्ससह त्याला तितकीच कडवी झुंज दिली. फोन्सेकाकडून ४७ अनफोर्सड एरर्स झाल्या, तर जोकोविचच्या खात्यात ३९ एरर्स जमा झाल्या. मात्र निर्णायक क्षणी फोन्सेकाने अधिक धाडसी खेळ करत सामना आपल्या बाजूने फिरवला. यापूर्वी २०१० मध्ये रोलँड गॅरोसमध्ये त्याला अशाच प्रकारे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा निकाल केवळ उलटफेर नसून जोकोविचच्या कारकिर्दीतील सर्वात धक्कादायक पराभवांपैकी एक मानला जात आहे.
À seulement 19 ans, Joao Fonseca s’est offert une victoire exceptionnelle et historique face à Novak Djokovic ce vendredi au troisième tour de Roland-Garros ↘️#RolandGarros https://t.co/L8xTDKSZGr — Roland-Garros (@rolandgarros) May 29, 2026
यंदाचा फ्रेंच ओपन जोकोविचसाठी ऐतिहासिक ठरू शकला असता. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू यानिक सिनर स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता, तर गतविजेता कार्लोस अल्काराझ दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. अशा परिस्थितीत विक्रमी २५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी जोकोविचकडे होती. मात्र फोन्सेकाकडून झालेल्या पराभवामुळे त्याचे हे स्वप्न भंगले. यासोबतच एक ऐतिहासिक बाबही निश्चित झाली आहे. जोकोविचच्या बाहेर पडल्यामुळे यंदाच्या फ्रेंच ओपन पुरुष एकेरीत नवीन ग्रँड स्लॅम विजेता मिळणार आहे. प्रथमच फ्रेंच ओपनच्या अंतिम १६ खेळाडूंमध्ये एकही माजी पुरुष ग्रँड स्लॅम विजेता नसणार आहे.
या पराभवानंतर जोकोविचच्या भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याला पुढील वर्षी रोलँड गॅरोसमध्ये खेळणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. “मला माहित नाही,” असे तो म्हणाला. जेव्हा त्याला विचारण्यात आले की हा फ्रेंच ओपनमधील त्याचा शेवटचा सामना ठरू शकतो का, तेव्हाही त्याचे उत्तर तेच होते. “मला माहित नाही. सध्या याबद्दल विचार करणे खूप कठीण आहे. तुम्ही माझी परिस्थिती समजू शकता,” असे भावनिक उत्तर त्याने दिले. 39 वर्षीय जोकोविच गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीशी झुंज देत असून त्याच्या भविष्यासंदर्भातील अनिश्चितता आता आणखी वाढली आहे.
दुसरीकडे, या विजयामुळे जोआओ फोन्सेकाचे नाव जागतिक टेनिसमध्ये अधिक चर्चेत आले आहे. या युवा खेळाडूने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवत फ्रेंच ओपनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आता पुढील फेरीत त्याच्याकडून आणखी दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.