Raigad: राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोकणकन्येची विक्रमी कामगिरी, सुवर्णपदकांची केली हॅट्रिक
किरण बाथम /रायगड :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४-२५ परभणी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूर, संभाजी नगर, नाशिक, नागपूर, अमरावती या आठ विभागातील कुस्तीपटूनी सहभाग घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावले होते.
मुंबई विभागाचे नेतृत्व करताना रायगडच्या क्षितिजा पूजा जगदीश मरागजे या कोकणकन्येने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवत नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. त्यामुळे राज्यात आणि कोकणभागात तिचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. खोपोलीसारख्या छोट्याशा गावातून पुढे येत कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवणारी क्षितीजा सर्वांसाठी आदर्श आहे.
क्षितिजा ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाची महिला मल्ल आहे. राजाराम कुंभार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, दिवेश पालांडे, विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षाासून क्षितीजा कुस्तीचा सराव करत आहे. ती खोपोली येथील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थीनी आहे. शाळेचे क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, समीर शिंदे, जयश्री नेमाने यांचे मार्गदर्शन तिला कायमच लाभले आहे. क्षितिजा केंद्रशासनाच्या स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या मुंबई येथील कुस्ती केंद्रात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राजसिंग चिकारा, अमोल यादव, शिल्पी नरशिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डावपेच शिकत आहे.
हेही वाचा-अवेळी घरी बोलावून, नको तिथे स्पर्श…; ऑलिम्पिक पदकविजेत्या कुस्तीपटूचा आत्मचरित्रात खळबळजनक खुलासा
राज्यस्तरीय पातळीवर केलेल्या सुवर्ण कामगिरीनंतर क्षितिजाची गोरखपूर – उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलग तीन वर्षे सुवर्णपदक मिळवून इतिहास रचलेल्या क्षितिजाचे का कॉन्व्हेंट स्कूलच्या मॅनेजर सिस्टर मरिना, मुख्याद्यापीका सिस्टर निर्मल मारिया, तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील, कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कुंभार, जिल्हा क्रीडाधिकारी राजेंद्र अतनूर, महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, किशोर पाटील, यशवंत साबळे, दत्ताजीराव मसुरकर, कोयना समाजाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अनेक मान्यवरांकडून कौतुक होत आहे.