सौजन्य - BCCI भारताची सेमीफायनलमध्ये धडक! अभिषेक शर्माचा झंझावात, राशीनची भेदक गोलंदाजीच्या जोरावर UAE चा दारुण पराभव
ACC T20 Emerging Teams Asia Cup : भारतीय क्रिकेट संघाच्या युवा स्टारने चमकदार कामगिरी केली आणि इमर्जिंग टीम आशिया चषक स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करीत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. गोलंदाजांमध्येसुद्धा चमकदार कामगिरीनंतर तुफानी सलामीवीर अभिषेक शर्मा (५८ धावा) याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) सात विकेट्स राखून पराभव केला.
भारतीय संघाचा सलग दुसरा विजय
भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. याआधी पहिल्या सामन्यात आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात धावांनी पराभव केला होता. भारत सध्या ‘ब’ गटात चार गुणांसह अव्वल आहे आणि बुधवारी त्यांच्या अंतिम गट सामन्यात यजमान ओमानशी सामना होईल. अभिषेकने केवळ 24 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह स्फोटक अर्धशतक केले. आयुष बडोनीच्या एका षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर भारताने 55 चेंडूत 108 धावांचे लक्ष्य गाठण्याची औपचारिकता पूर्ण केली. कर्णधार तिलक वर्माने 18 चेंडूत 21 धावा केल्या.
यूएईची खेळी
तत्पूर्वी, फलंदाजी करताना यूएई संघ 16.5 षटकांत 107 धावांवर बाद झाला. यूएईने पहिल्या दोन षटकांतच मयंक कुमार (१०) आणि आर्यांश शर्मा (१) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. वेगवान गोलंदाज रसीख सलामने त्याच्या सुरुवातीच्या षटकात तीन फलंदाजांना बाद करीत यूएईची धावसंख्या पॉवरप्लेमध्ये 5 बाद 40 अशी नेली. १५ धावांत तीन विकेट घेतल्याबद्दल सलामला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. रमणदीप सिंगनेही (सात धावांत दोन बळी) दोन बळी घेतले.