कोल्हापूरच्या पूजा दानोळेने जिंकले गोल्ड मेडल
रुद्रपूर: 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूरच्या पूजा दानोळेने आणखी एक पदकांची कमाई करीत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद जिंकून दिले. पूजाने शुक्रवारी साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या पूजा हिने आज 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिची या कामगिरीने महाराष्ट्राने रोड सायकलिंगचे विजेतेपदावर नाव कोरले.
डोंगरदर्यातील रुद्रपूरमधील शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या शर्यतीत पूजा हिने हे अंतर एक तास 45 मिनिटे 10.590 सेकंदात पार केले. सुवर्णपदक जिंकणार्या गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिला हे अंतर पार करण्यास एक तास 45 मिनिटे 10.512 सेकंद वेळ लागला. स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राने रोड सायकलिंगमधील महिला गटाचे विजेतेपदावर नाव कोरले.
ही दोन्ही पदके पूजा दानोळेने जिंकून महाराष्ट्राची शान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंचविली आहे. पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. पूजा हिला सुरुवातीला दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून सध्या ती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायकलींग अकादमीत अनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला.
डोंगरदर्यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने तीस किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली. टाईम ट्रायल म्हणजे पूजा असेच समीकरण सायकलिंग मध्ये मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावातील खेळाडू पूजा हिने आजपर्यंत मुलींच्या 14, 16 व 18 वर्षाखालील गटात तसेच वरिष्ठ महिलांच्या गटात याच क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने सुवर्ण पदकांचीच कमाई केली आहे.
कोल्हापूरच्या नेमबाजांवर मदार
ऑलिम्पिक कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे व अर्जून पुरस्कारार्थी अनुभवी नेमबाज राही सरनोबत या कोल्हापूरच्या स्टार नेमबाजांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची अपेक्षा वाढली आहे. शिवाय मुंबईची हिना सिद्धू व राष्ट्रीय पदकविजेती छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते हे नेमबाजही पदकाच्या शर्यतीत असतील. महाराष्ट्राचे नेमबाज यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किमान १५ पदके जिंकतील, असा विश्वास संघाच्या व्यवस्थापिका श्रद्धा नालमवार यांनी व्यक्त केला.






