BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची 'अकड' कायम (Photo Credit- X)
आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) ट्रॉफीवरून बीसीसीआय (BCCI) आणि एशियन क्रिकेट काउंसिलचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. बीसीसीआयने नुकताच एसीसीला (ACC) मेल करून ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी केली होती. मात्र, आता त्या मेलला उत्तर देत मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी थेट देण्यास नकार दिला आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा असूनही, एसीसीचे पाकिस्तानी प्रमुख मोहसिन नक्वी आपला पवित्रा सोडायला तयार नाहीत.
मिळालेल्या वृत्तानुसार, एसीसीच्या एका सूत्राने या संपूर्ण प्रकरणावर मोठे विधान केले आहे. एसीसीच्या सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयचा कोणताही प्रतिनिधी दुबईतील एसीसी मुख्यालयात (ACC Headquarter) येऊन ट्रॉफी घेऊ शकतो, परंतु भारतीय बोर्डाने ही अट मान्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, ते नक्वी यांच्याकडून थेट ट्रॉफी घेणार नाहीत. आता बीसीसीआय पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या (ICC) बैठकीत हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करणार आहे. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात एसीसीला मेल करून ट्रॉफी भारताला देण्यास सांगितले होते, मात्र नक्वी यांनी उत्तर देताना ‘कोणीतरी दुबईत येऊन ट्रॉफी घ्यावी’ असे सांगितले, त्यामुळे गतिरोध कायम आहे.
सध्या आयसीसीचे अध्यक्ष बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह आहेत. त्यामुळे आयसीसीच्या पुढील बैठकीत मोहसिन नक्वी यांच्या या भूमिकेवर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या आशिया कपची ट्रॉफी एसीसीच्या मुख्यालयात आहे. २८ सप्टेंबर रोजी आशिया कप फायनल जिंकल्यानंतर भारतीय संघाने मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता, त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले होते.
मोहसिन नक्वी यांनी आशिया कपच्या वेळी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सैन्य कारवाईची खिल्ली उडवणारे व्हिडिओ आणि मीम्स पोस्ट केले होते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. फायनलनंतर झालेल्या एसीसी बैठकीतही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा सामना झाला, जिथे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नक्वी यांना ट्रॉफी न दिल्याबद्दल खडसावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी नक्वी यांनी एसीसी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आदेशाशिवाय ट्रॉफी कोणालाही न देण्याचे निर्देश दिले आहेत.