
विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा (Photo Credit - X)
“देवाने संधी दिली तर…” : सिद्धूची मनातील इच्छा
नवज्योतसिंग सिद्धू यांनी इंस्टाग्रामवर विराटच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “जर देवाने मला एखादी इच्छा मागण्याची संधी दिली, तर मी प्रार्थना करेन की विराट कोहलीने आपली कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती मागे घ्यावी आणि पुन्हा एकदा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये मैदानात उतरावे.” सिद्धू यांच्या मते, विराट परतल्यास तो १.५ अब्ज भारतीयांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल.
विराटच्या तंदुरुस्तीचे कौतुक करताना सिद्धू यांनी त्याला “२४ कॅरेट शुद्ध सोनं” म्हटले आहे. ३७ व्या वर्षीही विराटची फिटनेस २० वर्षांच्या तरुणासारखी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कसोटी निवृत्तीचा ‘तो’ धक्कादायक निर्णय
याच वर्षाच्या सुरुवातीला ३७ वर्षीय विराटने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी हा निर्णय झाला. ऑस्ट्रेलियातील ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’मध्ये विराटचा फॉर्म खालावलेला दिसला होता. पर्थमध्ये शतक झळकावल्यानंतर त्याला ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंनी खूप त्रास दिला. या संघर्षानंतर त्याने क्रिकेटच्या सर्वात शुद्ध स्वरूपाला (Test) अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता.
पांढऱ्या चेंडूवर ‘किंग’चे वर्चस्व कायम
निवृत्तीनंतर मात्र विराटच्या बॅटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आग ओकण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावून आपण अजूनही मैदानावरचा राजा आहोत हे सिद्ध केले. विराटने स्पष्ट केले आहे की, त्याचे संपूर्ण लक्ष आता केवळ एकदिवसीय क्रिकेटवर आहे. त्यामुळे चाहत्यांची आणि सिद्धूंची इच्छा असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे पुनरागमन आता जवळजवळ अशक्य मानले जात आहे.