Blind Asia Cup : बांगलादेशला नमवत भारताची फायनलमध्ये धडक; 20 नोव्हेंबरला पाकिस्तानशी महामुकाबला! सौजन्य : आयएएनएस
Blind Asia Cup : ब्लाइंड आशिया कप 2026 मध्ये भारतीय दृष्टिबाधित क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी ढाका येथे झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने यजमान बांगलादेशचा 8 विकेट्सनी पराभव केला.
आता 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तानकडून झालेल्या एका विकेटच्या निसटत्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत बांगलादेशला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 123 धावांवर रोखले. कर्णधार टी. दुर्गा रावने तीन षटकांत 10 धावा देत एक विकेट घेतली. लोकेशा, देबराज बेहेरा आणि सुनील रमेश यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
भारतीय क्षेत्ररक्षकांनीही तीन फलंदाजांना धावबाद करत बांगलादेशच्या धावसंख्येला आळा घातला. बांगलादेशकडून मुहम्मद तहाफिजने 30 चेंडूंत नाबाद 36 धावा केल्या.
124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. सुनील रमेशने नाबाद 63 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 41 चेंडूंचा सामना करत सात चौकारांसह ही धावसंख्या उभारली. त्याचा स्ट्राइक रेट 153.66 इतका होता.
संजय कुमार शाहने 25 चेंडूंत 32 धावा करत त्याला चांगली साथ दिली. तर सुखरामने 15 चेंडूंत नाबाद 20 धावा केल्या. भारताने अवघ्या 13.2 षटकांत 2 बाद 124 धावा करत ४० चेंडू राखून विजय मिळवला.
अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार टी. दुर्गा राव यांनी संघाचा आत्मविश्वास व्यक्त केला. बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे संघाला अंतिम सामन्यासाठी बळ मिळाले आहे. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध केवळ एका विकेटने पराभव झाला होता. त्या सामन्यातील चुका लक्षात घेऊन 20 नोव्हेंबरला सर्वोत्तम कामगिरी करण्यावर संघाचे लक्ष असेल, असे त्यांनी सांगितले.
भारतामधील दृष्टिबाधितांसाठी क्रिकेट संघटनेचे (सीएबीआय) अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के. यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून, पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातही संघ विजेतेपद मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Ans: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 20 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.
Ans: भारताने यजमान बांगलादेशचा 8 विकेट्सनी पराभव केला.
Ans: साखळी फेरीत भारताला पाकिस्तानकडून एका विकेटने निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता अंतिम सामन्यात भारताला त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.






