PAK W vs BAN W: Alas! Pakistan lost to Bangladesh in Women's World Cup; lost by 7 wickets
Pakistan vs Bangladesh, Women’s World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धा ३० सप्टेंबर रोजी सुरू झाली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी, कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने आले होते. हा रोमांचक सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. पाकिस्तानची फलंदाजी बांगलादेशची गोलंदाजीसमोर अपयशी ठरली.
हेही वाचा : IND vs WI: भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलचा मोठा पराक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केली ‘ही’ कामगिरी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मुनीबा अलीने ३५ चेंडूत १७ धावा केल्या, परंतु दुसऱ्या टोकाकडून विकेट्स जात राहिल्या. उमैमा सोहेल आणि सिद्रा अमीन यांना भोपळा ही फोडता आला नाही. मधल्या फळीत, रमीन शमीमने ३९ चेंडूत २३ धावा केल्या आणि कर्णधार फातिमा सानाने ३३ चेंडूत २२ धावा करून डाव सावरला. तथापि, त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज मैदानावर टिकू शकला नाही आणि मोठी खेळी करू शकला नाही. आलिया रियाझनेही ४३ चेंडूत फक्त १३ धावा केल्या. परिणामी, पाकिस्तान ३८.३ षटकात १२९ धावांवर गारद झाला.
बांगलादेशच्या गोलंदाजांकडून अत्यंत शिस्तबद्ध गोलंदाजीचे दर्शन घडले. शोर्ना अख्तरने घातक गोलंदाजी करत फक्त ५ धावांत ३ बळी टिपले. दरम्यान, नाहिद अख्तरने ८ षटकात १९ धावांत दोन फलंदाजांना बाद केले. मारुफा अख्तरने देखील टिच्चून गोलंदाजी करत, ७ षटकांत ३१ धावांत २ बळी घेतले. सलमा खातून आणि इतर गोलंदाजांनीही किफायतशीर गोलंदाजी केली, ज्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर टिकाव धरता आला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने फरजाना हकला फक्त ७ धावांमध्ये गमावले. ती १७ चेंडूंत फक्त २ धावा केल्या आणि ती माघारी गेली. तथापि, त्यानंतर रुबिया हैदरने शानदार अर्धशतक झळकावून संघाचा डाव सावरला. तिने ७७ चेंडूत ५४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तिच्यासोबत निगार सुलतानाने २३ धावांचे योगदान देत महत्वाची भूमिका बाजवली. उर्वरित फलंदाजांनी देखील संयमाने खेळ केला आणि बांगलादेशने ३१.३ षटकांत लक्ष्य गाठून विजय सकार केला.
हेही वाचा : USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
या विजयासह, बांगलादेश महिला संघाने त्यांच्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरवात केली. दरम्यान, पाकिस्तानच्या खराब फलंदाजी कामगिरीमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांना आगामी सामन्यांमध्ये त्यांच्या फलंदाजीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, अन्यथा स्पर्धेत प्रगती करणे कठीण होण्याची शक्यता आहे.