PBKS vs RCB: What happens if IPL Qualifier 1 match is cancelled? Who will be in the final? Read in detail..
PBKS vs RCB : आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना आज २९ मे रोजी मुल्लानपूरच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण जो संघ आजचा हा सामना जिंकेल तो थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
पंजाब आणि आरसीबीकडे ट्रॉफीच्या जवळ जाण्याची आज सुवर्णसंधी असणार आहे. पण, आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, आजच्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे का? कारण याआधी, लीग टप्प्यात दोन्ही संघांचे सामने पावसामुळे रद्द झाले होते.
हेही वाचा : PBKS vs RCB : आज अय्यरसेना आणि पाटीदारसेनेते महामुकाबला! अशी असेल, दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-११
आयपीएल २०२५ मधील महत्वाची गोष्ट अशी की, प्लेऑफच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल स्पर्धा काही दिवस पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे प्लेऑफ आणि अंतिम सामने पुढे ढकलण्यात आले आणि ठिकाण देखील बदलण्यात आले आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. फायनल सामन्यासाठी ४ जून रोजी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, एलिमिनेटर, क्वालिफायर-१ आणि क्वालिफायर-२ साठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर पाऊस पडला तर त्याचा पंजाब संघाला त्याचा फायदा मिळणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव करून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्याच वेळी, आरसीबीने लखनौविरुद्ध लीग स्टेजचा शेवटचा सामना ६ विकेट्सने जिंकत १९ गुण मिळवले. परंतु ते पंजाबच्या रन रेटला मागे टाकण्यात अपयशी ठरले. अशा परिस्थितीत, क्वालिफायर-१ मध्ये पाऊस पडला तर ते पंजाबसाठी फायद्याचे ठरणार आणि संघ थेट अंतिम फेरीत धडक मारणार.
२९ मे रोजी मुल्लानपूरमधील हवामानाबद्दल सांगायचे झाल्यास सामन्यादरम्यान हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, मुसळधार पावसाची शक्यता नसल्याची सांगण्यात येत आहे. तथापि, आज मोहालीत ढगाळ वातावरण असणार आहे. ज्यामुळे चाहत्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. या काळात येथील तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे.