रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर(फोटो)
PBKS vs RCB : आज, गुरुवारी, इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हा सामना देखील अटीतटीचा होणार असल्याचे मानले जाता आहे. कारण, दोन्ही संघ फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी उत्तम राहिली आहे.
आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना मुल्लानपूरच्या मैदानावर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना आरसीबीसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच पंजाबसाठी देखील महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत धडक मारणार आहे. जो संघ पराभूत होईल त्याला एक सामना अधिक खेळायला मिळणार आहे. तर चला दोन्ही संघांचे रेकॉर्डबद्दल माहिती घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकदा देखील क्वालिफायर-१ सामना खेळलेला नाही. तथापि, संघाने दोनदा क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश मिळवला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये आरसीबीने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवता आला नाही.
तर दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जने एकदा क्वालिफायर-१ खेळलेला आहे. २०१४ मध्ये, संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत झाला होता, जिथे केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या अर्थाने, क्वालिफायर-१ मध्ये संघाचा विजयाचा टक्का १०० आहे, जो आरसीबीच्या संघाला घाबरवण्यासाठी पुरेसा ठरणारा आहे.
आयपीएलच्या इतिहासात जेव्हा केव्हा आरसीबी आणि पंजाब किंग्ज समोरासमोर आले आहेत, तेव्हा सामना खूपच रोमांचक झाला आहे. दोन्ही संघ चांगली लढत देतात. यामुळेच हेड टू हेडच्या बाबतीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब आणि बंगळुरू एकूण ३५ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाबने १८ सामने जिंकून आघाडी मिळवली आहे, तर आरसीबीने १७ सामने खिशात टाकले आहेत. तथापि, गेल्या ५ सामन्यांमध्ये बंगळुरूने ४ वेळा पंजाबचा धुव्वा उडवला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिल सॉल्ट, विराट कोहली, टीम सेफर्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, जोश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल.
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक/युजवेंद्र चहल