
Swara Kadam
वडूज : जिल्हा परिषद शाळा दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विद्यार्थिनी स्वरा राहुल कदम हिची राज्यपातळीवर कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे.जिल्हा परिषद शाळा दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विद्यार्थिनी स्वरा राहुल कदम हिने ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण पदक पटकावले.
Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला
स्वरा राहुल कदम हिची जिद्द, मेहनत आणि योग्य आहार याच्या जोरावर अतिशय कठीण स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. पैलवान स्वरा चे पालक अतिशय मेहनती व कष्टाळू आहेत त्यांनी स्वतः घरामध्ये तालीम मातीचा आखाडा, मॅटचे मैदान आणि मुलांना व्यायामासाठी व्यायामशाळा उभारली आहे. स्वरा जिल्हा परिषद शाळा दरूज येथे इयत्ता ६ वी मध्ये शिकत असून ती अभ्यासात देखील हुशार आहे. खेळ आणि अभ्यास याचा योग्य समन्वय ठेवून स्वराची वाटचाल सुरू आहे.
या यशाबद्दल सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,खटाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड, विस्तार अधिकारी सोनाली विभुते, केंद्रप्रमुख अमोल फडतरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रगती साधत तिने इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. स्वरा कदम हिचे यश ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. तिच्या या यशामुळे कुस्ती क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, तसेच आगामी स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी तिला नवी ऊर्जा मिळेल. राज्यस्तरीय स्पर्धेतही स्वरा अशीच चमकदार कामगिरी करून आपल्या शाळेचे, गावाचे आणि सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.