भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs Newzeland) यांच्यात टी २० मालिका झाल्यानंतर आता ऑकलंडमध्ये २५ नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची कमान ही शिखर धवनकडे असणार आहे. आशिया चषक २०२२ पूर्वी झालेल्या भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यावेळी देखील भारतीय संघाचे कर्णधारपद हे शिखर धवन कडे देण्यात आले होते. मात्र सामन्यापूर्वी ऐन वेळी केएल राहुलला कर्णधार करण्यात आले, याची बरीच चर्चा देखील झाली. यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर शिखर धवनने दिलेल्या उत्तरानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.
शिखर धवन म्हणाला की, “तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. हे माझ्यासाठी आव्हान आहे. आमच्याकडे तरुण खेळाडू अधिक आहेत त्यामुळे त्यांना जास्त वाव दिल्यास अधिक जास्त पर्याय संघाकडे उपलब्ध होऊ शकतात. पुढे धवन म्हणाला, “झिम्बाब्वे दौऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास केएल राहुल आमच्या संघाचा उपकर्णधार होता, तो परत आला तेव्हा मी लक्षात ठेवले की त्याला आशिया चषकला जायचे आहे. म्हणून मी एक पाऊल मागे येत त्याला कर्णधारपद घेण्यास सांगितले.
[read_also content=”मँचेस्टर युनायटेड क्लब मधून रोनाल्डो बाहेर https://www.navarashtra.com/sports/ronaldo-out-of-manchester-united-club-347820.html”]
“आशिया चषकादरम्यान रोहितला दुखापत झाली असती तर केएलला नेतृत्व करण्यास सांगितले असते, त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने सराव करणे चांगले आहे असे मला वाटले. मला याबाबत कुठलाही राग नाही किंवा मी दुखी नाही. आपल्या बाबतीत जे काही घडत असते ते सर्वकाही यौग्य असते असे मला वाटते. त्यानंतर नशिबाने दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी माझ्यावर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे खूप आनंदी आहे” असे शिखर धवन म्हणाला.