
फोटो सौजन्य - ANI/सोशल मिडिया
Rajeev Shukla on Gautam Gambhir’s future : भारताच्या संघाची मागील काही कसोटी मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. भारताच्या संघाला कसोटी मालिकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०२४ च्या मध्यात गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश झाला.
याशिवाय भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक आणि इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकले. गौतम गंभीरने मायदेशात ५ कसोटी सामने गमावले आहेत आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याचा सर्वात वाईट विक्रम आहे. गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून मुक्त केले जाईल की नाही याबद्दल अनेक चाहते विचार करत आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता गंभीरच्या भविष्याबद्दल मौन सोडले आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्याच्या अफवांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केले की सध्या नवीन मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्याची कोणतीही योजना नाही. राजीव शुक्ला म्हणाले, “गौतम गंभीरबाबत माध्यमांमध्ये येणाऱ्या अफवांना मी स्पष्टपणे उत्तर देऊ इच्छितो. बीसीसीआयचे सचिव (देवजीत सैकिया) यांनी आधीच स्पष्ट केले आहे की त्यांना भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्याचा आणि नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्याचा कोणताही विचार नाही.”
#WATCH | Delhi: Dismissing reports that the BCCI board is considering replacing or appointing a new head coach in the Test format in place of Gautam Gambhir, BCCI Vice-President Rajeev Shukla says, “I want to make it very clear regarding the speculation circulating in the media… pic.twitter.com/PKNQYpilP5 — ANI (@ANI) December 29, 2025
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळवलेले नसले तरी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये त्यांचा रेकॉर्ड प्रभावी आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर २०२५ चा आशिया कप जिंकला. गौतम मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गौतमची कामगिरी अपवादात्मक राहिली आहे. गंभीरचे एकमेव दुर्दैव कसोटीत आहे.