
Suryakumar Yadav breaks T20 record : भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. केरळविरुद्ध खेळतना सूर्यकुमार यादवने एक छोटी पण महत्वपूर्ण अशी खेळी खेळली असली तरी त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना केरळने १७८ धावा उभ्या केल्या होत्या, प्रत्युत्तरात मुंबई संघाला१६३ धावाच करता आल्या. परिणामी, मुंबईला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा : IND vs SA ODI series : “सुंदरची भूमिका स्पष्ट…” भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे विधान चर्चेत
सूर्यकुमार यादवने सामन्यात २५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने चार चौकार लगावले. या खेळीसह, सूर्याने टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्याने आदित्य तरेचा विक्रम मोडीत काढला आणि १७१७ धावा केल्या. तारेने मुंबईसाठी १७१३ धावा फटकावल्या होत्या. या धावांसह तो बराच काळ अव्वल स्थानी राहिला होता. आता सूर्यकुमार यादवने हा मान मिळवण्याची किमया साधली आहे.
सूर्यकुमार यादव २०१० पासून मुंबईसाठी टी-२० क्रिकेट खेळत आला आहे. या काळात त्याने ७१ सामन्यांमध्ये १७१७ धावा केल्या आहेत. ज्यात नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ६४ षटकार देखील खेचले आहेत. जे टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवतात. त्याच्या शैलीमुळे तो कोणत्याही गोलंदाजी लाइनअपवर हल्लाबोल करण्याची क्षमता ठेवतो. त्याचे सातत्य आणि स्ट्राईक रेटमुळे तो केवळ मुंबईसाठीच नाही तर भारतीय संघासाठी सर्वात महत्वाचा आणि भरवशाचा टी-२० खेळाडूंपैकी एक बनला आहे.
केरळच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. कर्णधार संजू सॅमसनने ४६ धावा, तर विष्णू विनोदने ४३ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. शेवटी, सैफुद्दीनने १५ चेंडूत ३५ धावा करून संघाला १७८ पर्यंत पोहचवले. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार लगावले.
हेही वाचा : कधीकाळी बाथरूममध्ये रडायचा! आता भारतीय संघात पुनरागमनासाठी थोपटले दंड; वाचा सविस्तर
धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सरफराज खानने ५२ धावांची झुंजार खेळी खेळली. परंतु, इतर फलंदाज मात्र आपली छाप पाडू शकले नाहीत. अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव प्रत्येकी ३२ धावा करून माघारी गेले. कर्णधार शार्दुल ठाकूर भोपळा न फोडता बाद झाला. तर शिवम दुबे फक्त ११ धावा करून बाद झाला. मुंबई संघाला १५ धावा कमी पडल्या. परिणामी संघाला पराभव पत्करावा लागला.