
T20 World Cup 2026: 'The biggest joy for me...', Jonathan Trott gets emotional as he bids farewell to Afghanistan cricket after four years
Jonathan Trott bids farewell to Afghanistan cricket : अफगाणिस्तान संघाचे टी-२० विश्वचषक २०२६ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. या दरम्यान, त्यांचा मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट जो गेल्या चार वर्षांपासून अफगाणिस्तान टीमसोबत आहे, त्याने संघाला अलविदा म्हटले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाला निरोप देताना इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू जोनाथन ट्रॉट भावुक झाला आहे. चार वर्षांच्या यशस्वी आणि भावनिक कार्यकाळानंतर ट्रॉटने आपल्या भूमिकेतून निरोप घेतला. ट्रॉटने आपल्या कार्यकाळात संघाची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ पाहिल्याबद्दल विशेष अभिमान देखील व्यक्त केला.
सुपर एट टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात कॅनडाला ८२ धावांनी पराभूत करून आपल्या मोहिमेचा शेवट गोड केला. सामन्यानंतर, ट्रॉट संघासोबतच्या त्याच्या वेळेबद्दल समाधान व्यक्त करताना भावनांनीही भारावून गेला होता.
ट्रॉटकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ही संधी मिळाल्याबद्दल तो भाग्यवान आहे. सुरुवातीला, त्याचे सहकारी इंग्लंडचे खेळाडू ग्रॅहम थॉर्प यांना हे पद देण्यात आले होते, परंतु तो ते स्वीकारू शकला नव्हता. ४४ वर्षीय ट्रॉटने पूर्ण उत्साह आणि समर्पणाने हे पद स्वीकारले आणि संघाला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तो म्हणाला की, “खेळाडूंची वैयक्तिक वाढ पाहणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद होता. त्यांनी केवळ मैदानावरच नाही तर त्यांच्या कुटुंबात आणि जीवनातही सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. खेळातून ही वाढ पाहणे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक असे होते.”
जोनाथन ट्रॉटने संघाच्या कामगिरीबद्दल देखील सांगितले की, स्पर्धेत कधीकधी नशीब त्यांच्या बाजूने दिसून आले नाही. त्याने विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर ओव्हरमधील पराभवाचा उल्लेख करताना म्हटले की, “जर आपण तो सामना जिंकला असता तर पुढच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध वेगळी रणनीती अवलंबली असती.”
ट्रॉटच्या कार्यकाळात, अफगाणिस्तान २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या जवळ पोहोचला होता. तर २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक मारली होती. ट्रॉट म्हणतो की त्याच्यासाठी, संघाची मैदानावरील कामगिरी खेळाडूंच्या वैयक्तिक आणि मानसिक विकासाइतकी महत्त्वाची नाही. ट्रॉटने निरोपाच्या वेळी, ट्रॉटने सर्व खेळाडूंना आणि अफगाणिस्तान क्रिकेट समुदायाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याने म्हटले की,हा प्रसंग त्याच्यासाठी नशीब आणि अनुभवाने भरलेला राहिला होता.