बंगळुरू : प्रो कबड्डीचा (Pro Kabaddi) नववा हंगाम आज ७ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. गेल्यावर्षी प्रो कबड्डीचा थरार प्रेक्षकां प्रत्यक्ष सामन्यात जाऊन अनुभवता आला नव्हता. यंदाची प्रो कबड्डी लीग ही स्पर्धा तीन ठिकाणी खेळवली जाणार असून आज पहिला सामना कंतीरवा बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. गतविजेते दबंग दिल्ली आणि माजी विजेते यु मुम्बा यांच्यातील सामन्याने या लीगची सुरुवात होणार आहे.
प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाल्यापासून पहिले तीन दिवस तीन-तीन सामने होणार आहेत. दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यानंतर बंगळूरू-तेलुगू आणि जयपूर-युपी योद्धा यांमध्ये सामना जिंकण्यासाठी चुरस पहायला मिळेल. या सामन्यांना सायंकाळी ७.३० पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा बंगळूरमध्ये पार पडल्यानंतर पुणे आणि हैदराबाद येथे सामने होणार आहेत.
दबंग दिल्ली संघाचा कर्णधार नवीन कुमार म्हणाला की, आम्ही गतविजेते असल्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे यंदाच्या मौसमातही चांगली कामगिरी करून पुन्हा प्रो कबड्डी लीगचा विजेता होण्यासाठी प्रयत्नगील आहोत. तसेच गेल्या वर्षी मी एक खेळाडू होतो; तर यंदा माझ्याकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. जबाबदारी बरोबरच आपली कामगिरी उंचावण्याचा माझा निर्धार आहे.