फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अलीकडेच आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव या १५ खेळाडूंच्या संघाचा कर्णधार असेल, तर उपकर्णधाराची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. संघाच्या घोषणेनंतर काही दिवसांनी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठे पाऊल उचलले आहे आणि २ निवडकर्त्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वृतांमध्ये असे सांगितले जात होते की बीसीसीआयने अजित आगारकर यांचा कार्यकाळ वाढवला आहे.
आता बीसीसीआयने आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर सोशल मिडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे. BCCI ने आज म्हणजेच गुरुवार, २२ ऑगस्ट रोजी दोन नवीन निवडकर्त्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. हो, याशिवाय, महिला संघ आणि कनिष्ठ संघाच्या निवडकर्त्यांचे पद देखील खुले आहे.
बीसीसीआयच्या प्रेस रिलीजनुसार, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) त्यांच्या वरिष्ठ पुरुष, महिला आणि ज्युनियर पुरुष निवड समित्यांमध्ये पदांसाठी अर्ज आमंत्रित करते.” बीसीसीआयने पुरुषांच्या राष्ट्रीय निवड समितीमध्ये दोन पदांसाठी अर्ज मागवले आहेत. निवडलेले सदस्य सर्व फॉरमॅटसाठी – कसोटी, एकदिवसीय, टी-२० आणि बीसीसीआयने ठरवलेल्या इतर कोणत्याही फॉरमॅटसाठी भारतीय संघ निवडण्याची जबाबदारी घेतील.
फक्त प्रथम श्रेणीचा अनुभव असलेले क्रिकेटपटूच राष्ट्रीय निवड समिती सदस्य बनण्यास पात्र आहेत. उमेदवाराने खालीलपैकी किमान एक निकष पूर्ण केला पाहिजे-
किमान ७ कसोटी सामने;
किंवा ३० प्रथम श्रेणी सामने;
किंवा त्याचबरोबर 10 एकदिवसीय सामने आणि 20 प्रथम श्रेणी सामने यांचा समावेश असणे गरजेचे आहे.
अतिरिक्त आवश्यकता:
किमान ५ वर्षांपूर्वी खेळातून निवृत्त झालेला असावा.
५ वर्षे कोणत्याही बीसीसीआय क्रिकेट समितीचा सदस्य नसावा.
यापूर्वीच्या माध्यमांच्या वृत्तांतात असे सुचवण्यात आले होते की अजित आगरकर, एसएस दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस शरथ यांचा समावेश असलेली सध्याची निवड समिती छाननीच्या अधीन आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) या समितीमध्ये बदल केले जाऊ शकतात असे वृत्त होते.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, शरथच्या जागी भारताचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा यांची नियुक्ती होऊ शकते असा अंदाज आता लावला जात आहे. शरथ ज्युनियर पुरुष निवड समितीचे प्रमुख असण्याची अपेक्षा आहे.