Badminton player Chirag Shetty
Badminton player Chirag Shetty : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारनेही भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, यावरून आता बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने महाराष्ट्र सरकारवर भेदभाव करीत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र सरकार केवळ क्रिकेटला प्राध्यान्य देत असून, इतर खेळांना सावत्र वागणूक देत असल्याचे त्याने सांगितले.
महाराष्ट्र सरकारवर भेदभावाचा आरोप
चिराग शेट्टीने नुकतीच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनी मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्याने महाराष्ट्र सरकारवर भेदभाव करत असल्याचे गंभीर आरोप केले. तसेच माझा क्रिकेटला विरोध नसून ज्या प्रकारे इतर खेळांना डावललं जातं, या वृत्तीला विरोध आहे, अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.
नेमकं काय म्हणाला चिराग शेट्टी?
“दोन वर्षांपूर्वी भारताने थॉमस चषक जिंकला होता. थॉमस चषक जिंकणं हा विश्वचषक जिंकण्यासारखा आहे. त्या भारतीय बॅटमिंटन संघाचा मी भाग होतो. भारतीय संघाने पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय संघात मी महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू होतो. मात्र, त्यावेळी सरकारने आमच्या विजयाकडे दुर्लक्ष केलं, असं चिराग शेट्टी म्हणाला. जर सरकार विश्वचषक विजेत्या संघाचा सत्कार करू शकते, तर ते इतर खेळातील खेळांडूंचा सत्कार का करत नाही? सरकारने सर्व खेळांना समान वागणूक दिली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
“बक्षिस सोडा, सरकारने माझा सत्कारही केला नाही”
पुढे बोलताना तो म्हणाला, “माझा क्रिकेटला विरोध नाही. मी सुद्धा क्रिकेटचे सामाने बघतो. विश्वचषकाचा अंतिम सामना मी पण बघितला. भारतीय संघाच्या विजयाने जो आनंद सर्वांना झाला, तेवढात आनंद मलाही झाला. मात्र, दोन वर्षांपूर्वी आम्ही अशाच प्रकारे उल्लेखनिय कामगिरी केली होती. आम्ही थॉमस चषक जिंकत इतिहास घडवला होता. परंतु, राज्य सरकारने रोख बक्षिस देणं सोडा, पण माझा साधा सत्कारही केला नाही”, अशी खंतही त्याने व्यक्त केली.