
IND vs SA 3rd ODI: King Kohli ready to create history! 'Virat' will be seen in Visakhapatnam; Speculations of 'this' record are rising
Virat Kohli to create record in Visakhapatnam : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आता चांगल्याच रंगतदार वळणारवर आली आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दूसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. आता मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा एकदिवसीय सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली विक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर आहे. कोहलीने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतके झळकावली असून तिसऱ्या सामन्यातही विराट कोहली मोठी धावसंख्या उभारून यश मिळवू शकतो. या मैदानावर विराट कोहलीचा एक शानदार विक्रम आहे.
रांची येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने १२० चेंडूत १३५ धावांची शानदार खेळी साकारली होती. हे विराटचे ५२ वे एकदिवसीय शतक ठरले होते. या शतकासह, विराटने कोणत्याही स्वरूपात सर्वाधिक शतकांचा विक्रम केला आहे. रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील त्याने पुन्हा एक शतक झळकावले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ९३ चेंडूत १०२ धावा फटकवल्या होत्या. मागील दोन सामने आणि मागील काही विक्रम लक्षात घेता, शनिवारी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विराट मोठी खेळी करण्याची शक्यता नकरता येत नाही.
हेही वाचा : हा तर रोनाल्डोच खेळताना दिसतोय! एका बिहारी मुलाचा फुटबॉल मैदानावर जादुई खेळ; Video पाहाल तर थक्क व्हाल
विराट कोहली हा विशाखापट्टणम येथे सर्वाधिक धावा करणारा आणि शतक करणारा फलंदाज असून त्याने २०११ ते २०२३ दरम्यान येथे खेळल्या गेलेल्या सात एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने ५८७ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सरासरी ९७.८३ इतकी राहिली आहे. हे आकडे स्पष्ट करतात की कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा विरोधी संघावर हल्लाबोल करू शकतो.
या मालिकेतील शेवटचा सामना ६ डिसेंबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमवर भारताचा मागील सहा वर्षाचा रेकॉर्ड वाईट राहिला आहे. येथे पहिला एकदिवसीय सामना २००५ मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हापासून, तेथे एकूण १० एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने सात जिंकले आणि दोन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.