फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ९ फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली गुडघ्यात सूज आल्यामुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर श्रेयस अय्यरला प्लेइंग ११ मध्ये सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. तर यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा या दोघांनी टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता कोहलीच्या पुनरागमनानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून कोणत्या खेळाडूला वगळले जाईल हे पाहणे बाकी आहे. त्याच वेळी, जर तुम्हालाही हा सामना मोफत पहायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ यासाठी सज्ज आहेत. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी १ वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर केले जाईल. याशिवाय, या सामन्याची हॉटस्टारवर मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट प्रेमी पाहू शकतात.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कटकमध्ये हलके ढग असतील. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहणार आहे, त्याशिवाय हवामानातील आर्द्रता ५२ टक्क्यांपर्यंत राहणार आहे. अशा परिस्थितीत पावसाची फारशी शक्यता नाही.
विराट कोहली दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्यास सज्ज आहे. पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा यांना पदार्पणाची संधी मिळाली. जिथे राणाचा पदार्पणाचा सामना उत्कृष्ट होता आणि त्याने ३ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, यशस्वीचा पदार्पणाचा सामना खास नव्हता आणि तो १५ धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर जयस्वालला वगळण्याची शक्यता आहे.
भारताचा संघ नागपूरमधून कटकला रवाना झाला आहे. याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारताचा संघ मालिकेमध्ये अभेद्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लडचा संघ मालिकेमध्ये बरोबरी करण्याच्या प्रयत्नांत असेल. रविवारी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी भारत विरुद्ध इंग्लड सामन्याची मेजवानी असेल. चॅम्पियन ट्रॉफीआधी दोन्ही संघामध्ये ही एकमेव मालिका असणार आहे.