Womesn League : वुमन्स कॉर्पोरेट टी-20 लीगमध्ये इम्प्रिंट डिस्प्ले संघाला विजेतेपद
कांदिवली (पश्चिम) येथील एमसीए सचिन तेंडुलकर (MCA Scahin Tendulkar Gymkhana) जिमखाना येथे झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सानिका चाळकेच्या नेतृत्वाखालील इम्प्रिंट डिस्प्ले संघाने मिताली म्हात्रेच्या नेतृत्वाखालील पार्श्व बुलियन संघावर वर्चस्व राखले.
प्रथम फलंदाजी करताना, इम्प्रिंट डिस्प्लेने 20 षटकांत 7 बाद 157 धावा केल्या; यात श्रद्धा शेट्टीने 42 चेंडूत 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पार्श्व बुलियनच्या प्रणाली कदमने 4 षटकांत 4 विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांच्या धावसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
प्रत्युत्तरात, पार्श्व बुलियन संघ 18.2 षटकांत 125 धावांपर्यंत मजल मारू शकला. इम्प्रिंट डिस्प्लेच्या विजयात सिद्धी राकामाची (4 षटकांत 3 विकेट) प्रभावी गोलंदाजी निर्णायक ठरली. श्रद्धा शेट्टीला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
इम्प्रिंट डिस्प्लेने विजेतेपदाचे 1 लाख रुपयांचे बक्षीस स्वीकारले, तर उपविजेत्या ठरलेल्या पार्श्व बुलियनला 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्व्हिफाय संघाच्या हुमैरा काझीला 4 डावांमध्ये 145.55 च्या स्ट्राईक रेटसह 159 धावा केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले आणि तिला 10 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
4.88 च्या इकॉनॉमी रेटसह 9 विकेट्स घेणाऱ्या मनाली दक्षिणीला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आले; तिलाही 10 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
संपूर्ण स्पर्धेत 6 ‘डिसमिसल्स’ (बाद करण्याच्या कृती) नोंदवणाऱ्या इम्प्रिंट डिस्प्लेच्या शार्वी सावेला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आले. फातिमा जाफरने 5 डावांमध्ये 2 बळी, 3 झेल आणि 127 धावा अशा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब पटकावला.
पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या डायना एडुलजी उपस्थित होत्या. तसेच पाहुणे म्हणून एमसीएचे सचिव प्रा. डॉ. उन्मेष खानविलकर आणि टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता उपस्थित होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कौन्सिल सदस्य आणि अमर क्रिकेटर्सचे अध्यक्ष भूषण पाटील म्हणाले, कॉर्पोरेट स्तरावर महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यात सहभागी होणाऱ्या कॉर्पोरेट संस्था निवडक खेळाडूंना योग्य रोजगाराच्या संधी आणि/किंवा वार्षिक करार उपलब्ध करून देतील, ज्यामुळे त्यांच्या क्रिकेटमधील व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या सर्व कॉर्पोरेट संस्थांचे आम्ही आभारी आहोत आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही विशेषतः मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानतो.






