Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात 'या' महत्त्वाच्या सुविधा
आधारशी संबंधित विविध सेवा डिजिटल पद्धतीने मिळवून देणाऱ्या आधार ॲपने पाच कोटी डाउनलोडचा टप्पा पार केला आहे. नागरिकांकडून सोयीस्कर आणि डिजिटल पद्धतीने आधार सेवा घेण्याला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ही माहिती दिली. आधार ॲपच्या माध्यमातून नागरिकांना स्मार्टफोनवरूनच मोबाईल क्रमांक, पत्ता आणि ई-मेल अद्ययावत करण्यासह बायोमेट्रिक माहिती लॉक किंवा अनलॉक करणे तसेच ई-आधार डाउनलोड करण्यासारख्या सुविधा मिळतात, त्यामुळे आधार केंद्राला भेट न देता अनेक सेवा घरबसल्या घेणे शक्य झाले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
आधार ॲपची रचना ‘दाखवा, सामायिक करा आणि पडताळणी करा’ या तत्वावर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या आधार माहितीच्या वापरावर अधिक नियंत्रण ठेवता येते. आधार ॲपच्या विस्तारासोबतच आधारच्या सुरक्षित ऑफलाइन पडताळणीची सुविधाही वाढविण्यात आली आहे. जानेवारीपासून यूआयडीएआयने २०० हून अधिक संस्थांना ‘ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्था’ अर्थात ओव्हीएसई म्हणून आपल्या प्रणालीशी जोडले आहे. सुरक्षित डिजिटल स्वाक्षरी असलेल्या कागदपत्रांचा वापर करून या संस्थांना ओळखीची पडताळणी करता येणार आहे.






