AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
ब्रिटनमधील ४५ वर्षीय एका महिलेने ऑनलाइन राजकीय चर्चेत सहभाग घेतला. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर ब्रिटन सरकारने कठोर कारवाई करावी का, यावर ती चर्चा होती. सुरुवातीला महिलेने अशा कठोर कारवाईला पूर्णपणे विरोध केला होता. मात्र, तिच्याशी चर्चा करणारी समोरची ‘व्यक्ती’ प्रत्यक्षात अँथ्रॉपिक कंपनीचे क्लाऊड हे एआय मॉडेल असल्याचे तिला नंतर समजले. चर्चेदरम्यान चॅटबॉटने आकडेवारी, उदाहरणे आणि विविध देशांतील कायद्यांचा आधार घेत तिच्या आक्षेपांना उत्तरे दिली. परिणामी, कठोर कारवाईच्या समर्थनाबाबत तिचे मत चर्चेच्या सुरुवातीला १०० पैकी शून्य होते, ते अखेरीस ८४.७ पर्यंत पोहोचले.
पारंपरिक राजकीय जाहिरात एकाच संदेशाचा मोठ्या संख्येने लोकांवर मारा करते. मात्र एआय प्रत्येक व्यक्तीशी वेगळी, सततची आणि परस्परसंवादी चर्चा करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नानुसार पुढचा युक्तिवाद बदलता येतो. यामुळे भविष्यातील राजकीय प्रचाराची दिशा अशी होऊ शकते.
पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
‘संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे राजकीयदृष्ट्या प्रवृत्त करण्याची साधने’ या अंतर्गत अभ्यासात ब्रिटनमध्ये यापूर्वी जवळपास ७७ हजार ब्रिटिश नागरिक सहभागी आणि ९१ हजार एआय संवाद तपासण्यात आले. हा सध्या एआयच्या राजकीय मन वळविण्याच्या क्षमतेवरील सर्वात व्यापक अभ्यासांपैकी एक आहे. त्यात असे आढळून आले की, विशिष्ट फाईन ट्यूनिंग तंत्रामुळे एआयची प्रभावीपणे मन वळविण्याची क्षमता ५१ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. विशिष्ट प्रॉम्प्टींग पद्धतीमुळे ही क्षमता २७टक्क्यांपर्यंत दिसली. एआयचे युक्तिवाद जितके माहितीने समृद्ध होते, तितके ते अधिक प्रभावी ठरले. मात्र येथे अत्यंत गंभीर धोका दिसला, अधिक प्रभावी एआय अनेकदा कमी अचूक माहिती देत होते.






