फोटो सौजन्य सोशल मीडिया
राष्ट्राध्यक्ष ली जे म्यून्ग यांनी त्याचा राजीनामा स्वीकारला आहे . महत्वाच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या अगदी आधी गैरप्रकार रोखण्यासाठी नियमांमध्ये घाईघाईने बदल करण्यात आले . मात्र या बदलांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला याची जबाबदारी स्वीकारत शिक्षणमंत्र्यांनी लगेच आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला .
या संपूर्ण प्रकरणाची सुरवात राष्ट्रीय कर लेखापाल परीक्षेतील एका उमेदवाराच्या कबुलीमुळे झाली . या परीक्षेत सर्वाधिक गन मिळवलेल्या उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे मान्य केले . त्याने शरीरावर लपवलेल्या छोट्या कॅमेऱ्याच्या मदतीने परीक्षेतील प्रश्नांचे फोटो काढले .
त्यानंतर हे प्रश्न स्मार्टफोनच्या माध्यमातून AI प्रणालीकडे पाठवून उत्तरे मिळवली . या प्रकारामुळे दक्षिण कोरियाच्या परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . खास बाब म्हणजे देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या काही दिवस आधीच हे प्रकरण समोर आले . त्यामुळे सरकारची चिंता वाढली .
या घटनेनंतर दक्षिण कोरिया सरकारने विद्यापीठ प्रवेश परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या . विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात केवळ पेन्सिल आणण्याची परवानगी देण्यात आली . कपड्यांवरील बटनांमध्ये छुपे कॅमेरे लपवले जाऊ नयेत म्हणून त्यावर स्टिकर्स लावण्यात आले .
विद्यार्थ्यांचे चष्मे , घड्याळे आणि कपड्यांचीही तपासणी करण्यात आली . परीक्षा केंद्रावरील सार्वजनिक वाय फाय बंद करण्यासह मोबाईल फोन जमा करण्याचे आदेश देण्यात आले . परीक्षेदरम्यान इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंधित गैरप्रकाराची १११ प्रकरणे निंदवण्यात आली . मात्र ही सर्व प्रकरणे AI वापरून केलेल्या कॉपीची असल्याचे सिद्ध झालेले नाही .
शिक्षणमंत्री चोई क्यो जीन यांनी परीक्षेच्या तयारीत पुरेशी काळजी घेतली नसल्याची टीका स्वीकारली . शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास झाल्याचे त्यांनी मान्य केले . त्यानंतर त्यांनी राजीनामा सादर केला आणि राष्ट्राध्यक्ष ली जे म्यून्ग यांनी तो स्वीकारला .
यंदाच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी देशभरातील १३१२ केंद्रावर ५ लाख ५१ हजार ८६४ उमेदवारांनी नोंदणी केली होती . दक्षिण कोरियामध्ये विद्यापीठ प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात . त्यामुळे AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे परीक्षा व्यवस्थेसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे .






