फोटो सौजन्य - Social Media
डिजिटल जगात वेगाने वाढणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे अनेक वापरकर्ते आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. हीच गरज ओळखून भारती एअरटेलने स्पॅम आणि ऑनलाईन फसवणुकीविरुद्ध लढा देण्यासाठी एक अत्याधुनिक, एआय-संचालित उपाय सादर केला आहे. या नव्या प्रणालीद्वारे व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल, ब्राउझर आणि एसएमएससारख्या ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मवर फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स ओळखल्या जातील आणि ग्राहक त्या साइट्सवर जाऊ नयेत यासाठी त्या तात्काळ ब्लॉक केल्या जातील.
ही सेवा एअरटेलच्या सर्व मोबाइल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी उपलब्ध असणार असून ती कोणत्याही अॅपची गरज न लागता स्वयंचलितपणे सक्षम केली जाईल. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. ग्राहक फसवणूक करणाऱ्या वेबसाइटवर जाण्याचा प्रयत्न करताच, त्या वेबसाईटचा प्रवेश थांबवला जाईल आणि त्याऐवजी एक स्पष्टीकरण देणारी स्क्रीन दिसेल, ज्यामधून ब्लॉकिंगचे कारण समजावले जाईल.
अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. OTP स्कॅम, बनावट कॉल्स, लिंक टॅप करून माहिती चोरणे अशा अनेक क्लृप्त्या गुन्हेगार वापरत आहेत. यामुळे अनेक सामान्य नागरिक आपली मेहनतीची कमाई गमावत आहेत. अशा परिस्थितीत एअरटेलने एक बहुस्तरीय सुरक्षा उपाय सादर केला आहे. यात डिव्हाईसवर आलेल्या दुव्यांचे विश्लेषण, डोमेन फिल्टरिंग, आणि जागतिक स्तरावर फसवणूक करणाऱ्यांचा डेटाबेस तपासणे यांचा समावेश आहे.
एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ग्राहक फसवणुकीला बळी पडले आहेत. यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आमच्या अभियंत्यांनी अत्याधुनिक फसवणूक शोधणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आमचा उद्देश ग्राहकांना इंटरनेटवर सुरक्षितपणे ब्राउझ करण्यासाठी मदत करणे हा आहे.” या प्रणालीने चाचणी दरम्यान अचूकतेचा उच्च स्तर सिद्ध केला असून एअरटेल आता अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी हे सुरक्षा कवच आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारतातील इंटरनेट वापर अधिक सुरक्षित होण्याची आशा आहे.