भारतातील 53 पैकी 52 ॲप फसवे नमुने वापरतात (फोटो सौजन्य - pinterest)
एएससीआय अकॅडमीने पॅरलल एचक्यू या डिझाइन फर्मच्या सहयोगाने केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे की, भारतातील 53 पैकी 52 ॲप फसवे नमुने वापरतात. गडद नमुने किंवा डार्क पॅटर्न्स या यूआय/यूएक्सच्या फसव्या युक्त्या असून, त्या दिशाभूल करणाऱ्या असू शकतात. ह्या युक्ता युजर्सची मुळात जे करण्याची इच्छा किंवा हेतू नसतो ते त्यांना करण्यास भाग पाडू शकतात. भारतातील लोकप्रिय ॲप्समधील फसव्या नमुन्यांबद्दल ‘कॉन्शिअस पॅटर्न्स’ (Conscious Patterns) या शीर्षकाखाली तयार करण्यात आलेला सर्वसमावेशक वेब अहवाल आज एका वेबिनारमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालातून समोर आलं आहे की, भारतातील 53 पैकी 52 ॲप फसवे नमुने वापरतात.
हेदेखील वाचा- iQOO Z9s Pro लवकरच भारतात होणार लाँच! स्मार्ट फीचर्ससह मिळणार खास अपडेट्स
विश्लेषण करण्यात आलेल्या 53 ॲप्सपैकी 52 ॲप्समध्ये फसव्या डिझाइन पद्धतींचा वापर केला जात असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. डार्क पॅटर्न्सच्या अशा विस्तृत वापरामुळे वापरकर्त्याची स्वत: निर्णय घेण्याची क्षमता तसेच माहितीपूर्ण निर्णय प्रक्रिया यांच्यावर परिणाम होऊ शकतो. या सगळ्या ॲप्सच्या डाउनलोडिंगचा एकत्रित आकडा 21 अब्जांवर जातो, यातून ग्राहकांवर परिणाम करण्याची संभाव्यता लक्षात येते. या अहवालात अधिक नीतीमत्तापूर्ण डिझाइन्सची उदाहरणेही देण्यात आली आहेत. ॲप डिझाइनसाठी एक स्कोअरिंग साधन वापरण्याची सूचनाही अहवालात करण्यात आली आहे. या क्षेत्रातील अनेकविविध आव्हाने व त्यांवरील उपाय यांवर प्रकाश टाकण्यासाठी उद्योग संघटना नासकॉम एएससीआय आणि पॅरलल यांच्यासोबत सहयोग करत आहे.
हेदेखील वाचा- रोबोट खिशात हात घालून पदक जिंकू शकतात का? ऑलिंपिक चॅम्पियन नेमबाजचा Elon Musk ला प्रश्न
या अहवालात फसव्या नमुन्यांचे 12 वेगवेगळे प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये खासगीत्वाबाबत फसवणूक, इंटरफेस फसवणूक, ड्रिप प्रायसिंग (उत्पादनाच्या किमतीचा केवळ काही भागच प्रसिद्ध करणे) आणि निकडीचा भास निर्माण करणे (फॉल्स अर्जन्सी) यांचा समावेश आहे. हे फसवे नमुने प्रकार ऑनलाइन इंटरफेसेसवर अधिक प्रमाणात वापरले जातात. खासगीत्वाबाबतची फसवणूक हा सर्वांत प्रचलित फसवणुकीचा नमुना असल्याचे अभ्यासात आढळले. विश्लेषण केलेल्या ॲप्सपैकी 79 टक्के ॲप्समध्ये अशा प्रकारची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. तर इंटरफेस फसवणूकीचे प्रमाण 45%, ड्रिप प्रायसिंग फसवणूकीचे प्रमाण 43% आणि फॉल्स अर्जन्सी फसवणूकीचे प्रमाण 32 % आहे. या अहवालानंतर ॲप्सच्या विकासामध्ये अधिक जागरूकतेने काही प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते.
जून 2023 मध्ये एएससीआयने प्रामुख्याने जाहिरातींमध्ये वापरल्या जाणाऱ्या फसव्या नमुन्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये ग्राहक व्यवहार विभागाने (डीओसीए) 13 फसव्या नमुन्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विहित डार्क पॅटर्न्सपैकी कोणत्याही पॅटर्नचा वापर हा दिशाभूल करणारी जाहिरात, चुकीची व्यापार पद्धत किंवा ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघनासाठी करण्यात आल्याचं समजलं जाऊ शकतं.
अहवालानुसार, 80 टक्क्यांहून अधिक ॲप्सच्या सेटिंग्ज/प्रोफाइल विभागांमध्येच फसवे नमुने आढळले. अभ्यासासाठी घेण्यात आलेल्या सर्व ई-कॉमर्स ॲप्समध्ये वापरकर्त्यांसाठी त्यांची खाती डिलीट करण्याची प्रक्रिया कठीण ठेवण्यात आली आहे. 4/5 हेल्थ-टेक ॲप्सचा भर काळाच्या निकषावर दबाव टाकण्यावर असल्याचे आढळलं. बास्केट स्नीकिंग अर्थात ग्राहकाने खरेदी करण्यासाठी निवडलेल्या वस्तूंच्या यादीत काही वस्तू त्याची/तिची संमती न घेता घालण्याचे प्रकार अन्य विभागांच्या तुलनेत डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक्स ॲपमध्ये चार पटींनी अधिक आढळून आले. हेल्थ टेक, ट्रॅव्हल बुकिंग आणि ई-कॉमर्स या ॲपमध्ये सर्वाधिक फसवे नमुने आढळलेले आहेत.
यूआय/यूएक्स डिझायनर्स आणि डेव्हलपर्सना सक्षम करण्यासाठी या अहवालात एथिकल स्कोअर कॅलक्युलेटर हे मोलाचे साधन सुचवण्यात आले आहे. त्याद्वारे व्यावसायिकांना त्यांच्या अॅप्स व वेबसाइट्स नीतीमत्तेच्या दृष्टीने कशा आहेत याचे मूल्यमापन करता येते. फसव्या नमुन्यांचे अस्तित्व निश्चित करून हे मूल्यमापन केले जाते. या संसाधनाला पूरक म्हणून ‘गॅलरी ऑफ इन्स्पिरेशन’चा वापर केला जाऊ शकतो. यात ग्राहकांच्या दृष्टीने अधिक न्याय्य व नियमांची पूर्तता करणाऱ्या प्रवाहांची व नमुन्यांची उदाहरणे बघायला मिळतात. भविष्यकाळात अॅप्स विकसित करताना या पर्यायांचा विचारही सक्रियपणे केला जाऊ शकतो.
एएससीआय अकॅडमीच्या संचालक नम्रता बचानी, ग्राहक व्यवहार विभागाचे माजी सचिव श्री. रोहित कुमार सिंग, नासकॉममधील पब्लिक पॉलिसी विभागाचे प्रमुख आशीष अगरवाल, पॅरललचे संस्थापक रॉबिन धनवानी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व महासचिव मनीषा कपूर यांनी या वेबिनारला हजेरी लावली होती.
एएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व महासचिव मनीषा कपूर म्हणाल्या, ”डिजिटल परिसंस्थेतील फसवे नमुने ग्राहकांच्या विश्वासाला व पारदर्शकतेला हानी पोहोचवतात. केवळ आघाडीच्या 53 ॲप्सचे 21 अब्जांहून अधिक वेळा डाउनलोडिंग झाले आहे. हे बघता ग्राहकांवर ॲप्स, वेबसाइट्स आणि अन्य डिजिटल इंटरफेसेसच्या माध्यमातून फसव्या नमुन्यांचा किती मारा होत असेल याचा विचारही चक्रावून टाकणारा आहे. ग्राहकांचा माहितीपूर्ण निर्णय घेण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी जागरूकतेने डिझाइन तत्त्वांचे अनुसरण करण्याचे आवाहन आम्ही कंपन्यांना करतो. गॅलरी ऑफ इन्स्पिरेशन आणि स्कोअर कॅलक्युलेटर ही योग्य पद्धतीने काम करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी महत्त्वाची संसाधने आहेत.”
पॅरललचे संस्थापक रॉबिन धनवानी म्हणाले, ”आमच्या संशोधनाद्वारे भारतातील ॲप्समधील फसव्या नमुन्यांचे सुक्ष्म पण व्यापक प्रचलन उघड झाले आहे. त्यामुळे अधिक पारदर्शक डिझाइन सरावांकडे वळण्याच्या गरजेवरही प्रकाश टाकला गेला आहे. नीतीमत्तापूर्ण डिझाइन्सचा पुरस्कार करून आम्ही वापरकर्त्यांचा विश्वास तर कमावतोच, शिवाय, ग्राहकांच्या स्वायत्ततेचा सन्मान करणारा नवोन्मेष निर्माण करतो. ॲप्स तयार करणाऱ्यांना वाढीच्या धोरणांचा पुनर्विचार करण्यास तसेच भविष्यकाळातील त्यांच्या उत्पादनांचा पाया म्हणून वापरकर्त्याला प्राधान्य देण्यास हा अहवाल प्रोत्साहन देईल अशी आशा आम्हाला वाटते.”