बॅन केलेल्या Chinese Apps चं भारतात होतंय पुनरागमन! Shein पासून Xender पर्यंत, वाचा कोणाकोणाचा यात समावेश
तुम्हाला आठवतयं का 2020 मध्ये भारताने काही चीनी अॅप्सवर कारवाई करत त्यांच्यावर बंदी घातली होती. 2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. परिणामी सरकारने भारतातील अनेक चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या अॅप्समध्ये टिकटॉक, शीन, यूसी ब्राउझरसह 59 अॅप्सचा समावेश होता. एवढचं नाही तर सरकारने 2022 मध्ये पुन्हा एकदा चिनी अॅप्स बाबत कठोर पाऊल उचलत PUBG, Garena Free Fire चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आतापर्यंत सरकारने सुमारे 200 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता हे चिनी अॅप्स भारतात परत येत आहेत.
काही दिवसांपूर्वीच रिलायन्स रिटेलने चीनी फास्ट-फॅशन ब्रँड ॲप Shein भारतात रिलाँच केलं आहे. काही अटी आणि नियमांसह हे अॅप पुन्हा भारतात परतलं आहे. यानंतर आता इतर अनेक अॅप्स भारतात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. काही अॅप्स भारतात रिलाँच करण्यात आले आहेत, तर काही अॅप्स लवकरच भारतात परत येऊ शकतात. पण काही अॅप्सनी पुनरागमन करताना त्यांची मालकी बददली आहे, तर काही त्यांच्या जुन्या स्वरूपात परत आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलच्या प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर दिसणाऱ्या यापैकी अनेक अॅप्सनी त्यांचे मालक बदलले आहेत आणि अनेकांचा पत्ताही बदलला आहे. कोणीतरी नावात थोडासा बदल केला आहे, किंवा कोणीतरी क्लोन तयार केला आहे. मात्र वैशिष्ट्ये आणि लोगो जवळजवळ जुन्याप्रमाणेच ठेवण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अशा एकूण 267 अॅप्सना गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. 267 बंदी घातलेल्या अॅप्समध्ये लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकचाही समावेश होता. पण आता हे अॅप्स पुन्हा भारतात परतत आहेत. एकूण 36 बंदी घातलेले अॅप्स आता पुन्हा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. सरकारने बंदी उठवली आहे का? तर टिकटॉक देखील परत येणार आहे का? नाही, असं काही नाहीये. काही अटी आणि नियमांसह हे अॅप्स इतर कंपन्यांनी रिलाँच केले आहेत.
मोदी सरकार करणार DeepSeek चा पर्दापाश! सुरु झाली चौकशी, लवकरच जगासमोर येणार चीनी AI चं काळ सत्य
गेल्या काही काळापासून भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सुधारणा होत आहे. दरम्यान, आता अनेक चिनी अॅप्स डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. 2020 मध्ये बंदी घातलेले फाइल शेअरिंग अॅप्स, Xender आता अॅपल अॅप्स स्टोअरवर “Xender: File Share, Share Music” या नावाने उपलब्ध आहे. तथापि, ते अद्याप गुगल प्ले स्टोअरवर आलेले नाही. त्याचप्रमाणे, Taobao आता Taobao Mobile नावाने परतले आहे. TanTan नावाच्या आणखी एका अॅपने आपले नाव बदलून TanTan- एशियन डेटिंग अॅप असे केले आहे.
चिनी फास्ट फॅशन अॅप Shein वरही भारतात बंदी घालण्यात आली होती, परंतु आता ते पुन्हा एकदा डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. यावेळी हे अॅप रिलायन्स रिटेलने पुन्हा लाँच केले आहे. या वेबसाइटवर विकले जाणारे सर्व कपडे देशाच्या नियमांचे पालन करून देशातच बनवले जातील. 1 फेब्रुवारी रोजी लाँच झालेल्या या अॅपला “Shein इंडिया फास्ट फॅशन” असे नाव देण्यात आले आहे. त्याचा डेटा फक्त भारतातच साठवला जाईल.