आयफोनवरील टॅरीफचा काय होणार परिणाम (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
यावर्षी आयफोन खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत आहात का? असे असेल तर खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धादरम्यान आयफोनच्या किमती वाढू शकतात का, यावर अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी मोठे विधान केले आहे.
टिम कुक म्हणाले की, आतापर्यंत अमेरिकेने चीनवर लादलेल्या आयात शुल्काचा कंपनीच्या उत्पन्नावर फारसा परिणाम झालेला नाही. मार्च तिमाहीत अॅपलने आपल्या पुरवठा साखळीचे चांगले व्यवस्थापन करून या वाढत्या खर्चाचे व्यवस्थापन केले. पण येत्या काही महिन्यांत काय होईल याबद्दल त्यालाही पूर्णपणे खात्री नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर सध्याच्या टॅरिफ स्थितीत कोणताही बदल झाला नाही तर कंपनीला सुमारे $900 दशलक्ष (सुमारे 7,500 कोटी रुपये) अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
आयफोनच्या किमती वाढतील का?
अॅपलने आतापर्यंत या वाढलेल्या किमती स्वतःच सोसल्या आहेत आणि त्याचा कोणताही फटका हा त्यांनी त्यांच्या ग्राहकांना दिलेला नाही. याबाबत टिम कुक म्हणाले, “आमच्या टीमने सप्लाय चेन खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे आणि आम्ही ते पुढेही करत राहू.” याचा अर्थ असा की अॅपल सध्या आयफोनच्या किमती वाढवत नाहीये, पण जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर किमती वाढू शकतात असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अॅपलचा बॅकअप प्लॅन
अॅपलच्या किमतीत वाढ होऊ शकते का
अॅपल आधीच चीनवरील आपले अवलंबन कमी करत आहे. कंपनीने तिच्या अनेक उत्पादनांपैकी उत्पादन हे भारत आणि व्हिएतनाममध्ये हलवले आहे. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या अर्ध्याहून अधिक आयफोन आता भारतात बनवले जातात. तर मॅकबुक, आयपॅड, एअरपॉड्स आणि अॅपल वॉचसारखी उत्पादने व्हिएतनाममध्ये तयार केली जात आहेत. टिम कुक म्हणाले, ‘आम्हाला आधीच समजले होते की एकाच देशावर अवलंबून राहणे हा एक मोठा धोका आहे. म्हणूनच आम्ही सप्लाय चेन वेगवेगळ्या देशांमध्ये पसरवली आहे.
ट्रम्प यांचे धोरण आणि वाढत्या शुल्काचा धोका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर ‘१४५% पर्यंत कर’ लावण्याची घोषणा केली होती. याचा अॅपलसारख्या कंपन्यांवर मोठा परिणाम होऊ शकला असता. तथापि, काही दिवसांनंतर, ट्रम्प प्रशासनाने स्मार्टफोन, संगणक आणि तंत्रज्ञान उत्पादनांना यातून सध्यातरी सूट दिली, जेणेकरून कंपन्यांना त्यांचे उत्पादन चीनबाहेर हलविण्यासाठी वेळ मिळेल.
पण ही सूट कायमची नाही. येत्या काळात अमेरिका पुन्हा एकदा टॅरिफ वाढवू शकते, ज्यामुळे आयफोन आणि इतर गॅझेट्सच्या किमती वाढू शकतात. सध्या आयफोनच्या किमती स्थिर आहेत, परंतु हे किती काळ असेच राहील याची खात्री नाही. टॅरिफ आणि आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणातील बदलांसह अॅपलची रणनीती देखील बदलू शकते. जर खर्च खूप वाढला तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावरही होऊ शकतो अशी सद्यस्थिती आहे.