फोटो सौजन्य - pinterest
देशात सुरु असणाऱ्या ऑनलाईन स्कॅमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्गा शोधत आहेत. कधी बनावट अॅप्स तर कधी बनवाट वेबसाईट, तर कधी खोटे मॅसेज. काही दिवसांपूर्वीच देशभरातील अनेकांच्या फोनवर एक मॅसेज आला होता, ज्यामध्ये म्हटलं होतं की, तुमच वीज कनेक्शन कापलं जाणार आहे. यामुळे देशभरातील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मॅसेज व्हायरल झाला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, बिल भरलं नसल्यामुळे तुमचं गॅस कनेक्शन कापलं जाणार आहे. यानंतर आता देशभरातील अनेकांच्या फोनवर एक मॅसेज पुन्हा व्हायरल होत आहे. पण हा मॅसेज तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी आहे. India Post च्या नावाखाली हा बनावट मॅसेज पाठवण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- ‘तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे….’ तुम्हालाही असा मेसेज आलाय का? आताच सावध व्हा
India Post च्या नावाखाली आलेल्या या बनावट मॅसेजमध्ये म्हटलं आहे की, ‘तुमचं पार्सल इंडिया पोस्टच्या गोदामात आलं आहे, परंतु अपूर्ण पत्त्याच्या माहितीमुळे ते वितरित केलं जाऊ शकत नाही. या कारणास्तव तुम्हाला 12 तासांच्या आत एसएमएसमध्ये दिलेल्या वेब लिंकचा वापर करून तुमचा पत्ता अपडेट करावा लागेल. पत्ता अपडेट केला नाही तर तुमच्या सर्व ऑर्डर रद्द केल्या जातील.’ पार्सल रद्द होणार या भितीने अनेकजण त्या बनावट वेबसाईटवर क्लिक करतात आणि सायबर फ्रॉडचे शिकार होतात. एवढेच नाही तर सायबर स्कॅमर लोकांना बनावट फोन करतात आणि आपण इंडिया पोस्टचा अधिकारी बोलत असल्याचं सांगून लोकांची फसवूणक करतात.
हेदेखील वाचा- अरे बापरे! ‘आज रात्री 9.30 नंतर तुमचा वीज पुरवठा खंडीत होणार…’ तुम्हालाही असा मेसेज आलाय का?
India Post च्या नावाखाली आलेल्या या बनावट मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास ही लिंक एक नवं वेब पेज ओपन करेल. येथे तुम्हाला पुन्हा वितरणासाठी 80 रुपये किंवा 100 रुपये टोकन रक्कम भरावी लागेल. पण यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स त्यामध्ये भरणे आवश्यक असते. कमी पैशांमुळे, लोक त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा तपशील देऊन पेमेंट करतात. पण या चुकीमुळे, लोकांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे तपशील घोटाळे करणाऱ्यांपर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे लुटले जातात. परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर या सायबर स्कॅमपासून अगदी सहज स्वत:ला वाचवू शकता.