Tata Deliver Sangam Jal: टाटा ग्रुपने सुरु केली नवीन सर्विस, घरबसल्या मिळणार त्रिवेणी संगम जल; अशा पद्धतीने करा ऑर्डर
येत्या काही दिवसांत महाकुंभाची सांगता होणार आहे. त्यामुळे सध्या मोठ्या संख्येने भाविक महाकुंभाला जात आहेत. मात्र ज्या भाविकांना महाकुंभाला जाता येत नाहीत, त्यांच्यासाठी टाटा ग्रुपने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. टाटा ग्रुपच्या ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म बिगबास्केटने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आता भाविक महाकुंभ मेळ्यातून पवित्र त्रिवेणी संगम जल ऑनलाइन खरेदी करू शकतात. ज्या भाविकांना यंदा महाकुंभाला जाणं शक्य झालं नाही, पण त्यांना गंगाजल हवं आहे अशा भाविकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
हिंदू धर्मात पवित्र त्रिवेणी संगम जल अत्यंत पवित्र मानले जाते आणि आता ते थेट बिगबास्केटच्या मोबाइल अॅपवरून ऑर्डर करता येणार आहे. हा उपक्रम विशेषतः अशा भाविकांसाठी सुरू करण्यात आला आहे जे काही कारणास्तव महाकुंभमेळ्याला उपस्थित राहू शकत नाहीत. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावरून घेतलेले हे पाणी आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे मानले जाते. तुम्हाला देखील पवित्र त्रिवेणी संगम जल खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते घरी बसून ऑर्डर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
बिगबास्केटवर स्वस्ती महाकुंभ पवित्र त्रिवेणी संगम जल विक्रीसाठी उपलब्ध आहे, ज्याची किंमत फक्त 69 रुपयांपासून सुरू होते आणि ही 100 मिली बाटली आहे. कंपनीचा दावा आहे की हे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि मूळ संगम पाणी आहे. बिगबास्केटने उत्पादनाच्या वर्णनात नमूद केले आहे की हे पाणी पूजा, धार्मिक विधी, मूर्तींचे स्नान आणि घरं आणि कार्यालयं शुद्ध करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
यावर्षी, ब्लिंकिटने प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यात एक तात्पुरते स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याबद्दल माहिती दिली.
या दुकानात पूजा साहित्य, दूध, दही, फळे आणि भाज्या (दान आणि स्वतः वापरण्यासाठी), चार्जर, पॉवर बँक, टॉवेल, ब्लँकेट, चादरी आणि भाविक आणि पर्यटकांसाठी इतर आवश्यक वस्तू असतील. याशिवाय, येथून त्रिवेणी संगम जलाच्या बाटल्या देखील खरेदी करता येतात. सीईओ धिन्सा म्हणाले की, त्यांची टीम विशेषतः महाकुंभासाठी आवश्यक असलेल्या वस्तू पुरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.