WhatsApp ला NPCI कडून मिळालं न्यू ईयर गिफ्ट, आता सर्व यूजर्सना मिळणार या सर्विसचा फायदा
तुम्ही देखील व्हॉट्सॲपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये व्हॉट्सॲपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून एक खास गिफ्ट देण्यात आलं आहे. हे गिफ्ट केवळ व्हॉट्सॲपसाठीच नाही तर व्हॉट्सॲप युजर्ससाठी देखील खास असणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने WhatsApp Pay वरून यूजर कॅप काढून टाकली आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपला 500 मिलियनपेक्षा जास्त यूजर बेसला युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर आणण्याची परवानगी मिळाली आहे. या निर्णयाची घोषणा करताना NPCI ने सांगितले की, WhatsApp Pay वरील 100 मिलियन यूजर्सची लिमिट हटवण्यात आली आहे. 2025 ची सुरुवात आनंदाच्या बातमीने करण्यात आली आहे. व्हॉट्सॲपला आणि त्याच्या युजर्सना या निर्णयाचा किती फायदा होणार, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
2020 मध्ये लाँच झाल्यापासून व्हॉट्सॲप पेवरील निर्बंध हळूहळू शिथिल झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला त्याची मर्यादा दहा लाख युजर्सपर्यंत होती. त्यानंतर 2022 मध्ये ही मर्यादा 100 मिलीयन करण्यात आली आणि आता ती पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने तत्काळ प्रभावाने व्हॉट्सॲप पे (थर्ड पार्टी ॲप प्रोवाइडर) साठी UPI यूजर ऑनबोर्डिंग मर्यादा काढून टाकली आहे. या डेवलपमेंटसह, व्हॉट्सॲप पे आता UPI सेवा भारतातील त्याच्या संपूर्ण वापरकर्त्यांपर्यंत वाढवू शकते.
यापूर्वी, NPCI ने व्हॉट्सॲप पेला टप्प्याटप्प्याने आपला UPI वापरकर्ता आधार वाढवण्याची परवानगी दिली होती. मात्र आता ही मर्यादा पूर्णपणे हटविण्यात आली आहे. या सूचनेसह, NPCI व्हॉट्सॲप पेवर वापरकर्त्याच्या ऑनबोर्डिंगवरील मर्यादा निर्बंध हटवत असल्याचं NPCI ने सांगितलं आहे. WhatsApp Pay विद्यमान TPAP ला लागू असलेल्या सर्व विद्यमान UPI मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सुरू ठेवणार आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मर्यादा हटविण्यात आली असली तरी कोणत्याही नियमांचं उल्लंघण केलं जाणार नाही.
स्पर्धात्मक UPI मार्केटमध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी WhatsApp Pay ने संघर्ष केला आहे. नोव्हेंबरमध्ये 51 मिलियन व्यवहार झाले, तर Google Pay आणि PhonePe चे मिळून 12 बिलियन व्यवहार झाले. तर, नोव्हेंबर 2023 मध्ये, WhatsApp Pay ने सुमारे 22 मिलियन ट्रांजेक्शन्सवर प्रक्रिया केली.
सावधान! तुम्हालाही JIO चा हा मॅसेज आलाय का? थांबा, अन्यथा रिकामं होईल Bank Account
दरम्यान, NPCI ने लोकप्रिय डिजिटल पेमेंट पद्धतींसाठी मार्केट शेअर कॅपची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी पुढे ढकलली आहे. Google Pay आणि PhonePe ला या निर्णयाचा फायदा होणार असल्यातं बोललं जात आहे. NPCI नुसार, 2024 च्या अखेरीस लागू होणारा हा आदेश आता डिसेंबर 2026 च्या अखेरीस लागू होणार आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये केलेल्या पहिल्या प्रस्तावानुसार, डिजिटल पेमेंट कंपन्यांना UPI द्वारे 30% पेक्षा जास्त व्यवहार करण्याची परवानगी नाही.