
Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! 'Vi Intelligence' उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार
‘वी इंटेलिजन्स लॅब’ हा ‘वी इंटेलिजन्स’ या विशेष एआय उपक्रमाचा केंद्रबिंदू असणार आहे. ‘पीडब्ल्यूसी इंडिया’च्या भागीदारीतून ही लॅब उभारण्यात आली आहे. ही लॅब उद्योगांसाठी आवश्यक एआय सोल्युशन्सचे संशोधन, विकास आणि विस्तार करण्याचे मुख्य केंद्र म्हणून काम करण्यासाठी उभारण्यात आली आहे. ही लॅब एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करेल, जी आघाडीचे एआय तज्ञ, स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि उद्योगांना एकमेकांशी जोडेल. एआयचा वापर करून प्रत्यक्ष व्यावसायिक आव्हानांवर उपाय शोधणे, हा याचा उद्देश आहे. यासाठी ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ मुंबईत ‘वी’च्या कार्यालयात एक विशेष ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (सीओई) टीम तैनात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एजेंटिक, असिस्टिव्ह, आणि सोव्हरिन व रिस्पॉन्सिबल एआय या तीन धोरणात्मक स्तंभांवर ‘वी इंटेलिजन्स लॅब’चे कामकाज आधारित असणार आहे. हे तीन स्तंभ ग्राहक, उद्योग आणि तांत्रिक कामकाज अशा सर्व स्तरांवर एआय उपाययोजनांच्या विकासासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील. ही लॅब एआय (AI) तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराला प्रोत्साहन देईल, तसेच डेटा, बौद्धिक संपदा आणि एआय प्रणालींचा वापर नैतिक आणि पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने केला जाईल.
या उपक्रमाबाबत ‘वी’ चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) जगबीर सिंग यांनी म्हटलं आहे की, आगामी काळात केवळ कनेक्टिव्हिटीच नाही तर ‘इंटेलिजन्स’ची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जागतिक पातळीवर एआय कौशल्य, धोरणात्मक भागीदारी आणि आमच्या डिजिटल पायाभूत सुविधा एकाच मंचावर आणण्यासाठी आम्ही ‘वी इंटेलिजन्स लॅब’ची मदत घेत आहोत. ग्राहकांच्या अनुभवाची गुणवत्ता सुधारण्यापासून ते विविध विभागांच्या अंतर्गत कामकाजाची पुनर्रचना करण्यापर्यंत, ही लॅब संस्थांना अत्यंत व्यावहारिक आणि सोप्या पद्धतीने एआय (AI) तंत्रज्ञान स्वीकारण्यास मदत करेल.
‘पीडब्ल्यूसी इंडिया’चे पार्टनर आणि लीडर (टीएमटी) विनिष बावा यांनी म्हटलं आहे की, आपण अशा युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केवळ संस्थांच्या कार्यपद्धतीतच बदल घडवून आणणार नाही, तर त्या कशा प्रकारे नाविन्य निर्माण करतात, स्पर्धा करतात आणि आपल्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण करतात, याची व्याख्याही पूर्णपणे बदलून टाकेल.