या देशात लवकरच बॅन होणार लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम, काय आहे कारण? जाणून घ्या
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम लवकरच व्हिएतनाममध्ये बॅन केलं जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला असून त्यामागील कारणं देखील स्पष्ट करण्यात आली आहे. सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सरकारने आरोप केला आहे की हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देशात अवैध कंटेंटचा प्रसार करत आहे. याशिवाय या प्लॅटफॉर्मद्वारे स्थानिक नियमांचे पालन केले जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
समोर आली Hacking Ranking! टॉप 10 देशांमध्ये भारताचा समावेश, हा देश आहे पहिल्या क्रमांकावर
व्हिएतनामच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने असं सांगितलं आहे की, देशात अनेक टेलिग्राम ग्रुप्स सरकारविरोधी कारवाया, फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर डेटा ट्रेडिंग यासारख्या गंभीर मुद्द्यांशी संबंधित कंटेटचे केंद्र बनले आहेत. या सर्वांमुळे गुन्हे वाढत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामने या क्रियाकलापांवर बंदी घालण्यासाठी किंवा कंटेटवर लक्ष ठेवण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सरकारी निर्देशांचे पालन केलेले नाही, किंवा त्यांनी देशात अधिकृत व्यावसायिक उपस्थिती स्थापित केलेली नाही, जी व्हिएतनामी कायद्यानुसार अनिवार्य आहे. या सर्वांमुळे आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारने देशातील इंटरनेट आणि टेलीकॉम सर्विस ऑपरेटर्सना टेलिग्राम सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, आतापर्यंत टेलिग्राम किंवा व्हिएतनामच्या तंत्रज्ञान मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लवकरच हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारने घेतलेला हा निर्णय व्हिएतनामच्या एक-पक्षीय सरकारच्या डिजिटल जागेवर नियंत्रण वाढवण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. फेसबुक आणि यूट्यूबसारखे जागतिक प्लॅटफॉर्म अजूनही देशात उपलब्ध असताना, सरकार ऑनलाइन मतभेद आणि अनधिकृत मजकुराच्या विरोधात कठोर भूमिका घेत आहे. 2023 मध्ये, व्हिएतनामने परदेशी सोशल मीडिया कंपन्यांना युजर्सची ओळख पडताळणे आणि गरज पडल्यास ही माहिती सरकारसोबत शेअर करणे बंधनकारक केले आहे. सरकारने देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पाऊलं उचलली आहेत.
सरकारने घेतलेला हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याच्या उद्देशाने आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. परंतु सरकारचा असा दावा आहे की हे उपाय देशात स्थिरता सुनिश्चित करतात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कायदा आणि सुव्यवस्था राखतात. सध्या, व्हिएतनाममध्ये टेलिग्रामचे भविष्य अनिश्चित दिसते, कारण सरकारने स्पष्ट केले आहे की ते त्यांच्या नियमांचे पालन न करणाऱ्या प्लॅटफॉर्मना देशात थारा देणार नाहीत. त्यामुळे आता लवकरच या देशात टेलिग्राम बॅन केलं जाणार असल्याची दाट शक्यता आहे.