दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
फेस्टिव सीजन सुरु झाला आहे. सर्वत्र सेल आणि ऑफर्ससह शॉपिंग करण्याची संधी मिळत आहे. सणानिमित्त सर्वत्र खरेदीचा उत्साह पाहायला मिळतो. दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी असते. यावेळी नवीन घर, गाडीपासून अगदी स्मार्टफोनपर्यंत लोकं नवीन वस्तूंची खरेदी करतात. दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि ऑफलाइन रिटेलर्स देखील सेल आणि ऑफर्ससह ग्राहकांना खरेदी करण्याची संधी देतात.
यंदाच्या दिवाळी किंवा धनत्रयोदशीला तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्हीही या सणाच्या निमित्ताने नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही सामान्य चूका करणं टाळा, अन्यथा सवलतीच्या मागे लागून तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
दिवाळी आणि धनत्रयोदशीला ऑनलाईन सेल्समध्ये स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात. त्यामुळे हे डिस्काऊंट पाहूनलोकं आकर्षित होतात आणि ‘Buy Now’ बटनवर क्लिक करतात. परंतु तुमच्या फोनवरील सवलत खरी आहे की फक्त एक मार्केटिंग प्लॉय आहे हे पडताळणे महत्त्वाचे आहे. कंपन्या अनेकदा सणासुदीच्या काळात किंमती वाढवून आणि नंतर सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
अनेकदा लोकं कॅमेऱ्याचा मेगापिक्सेल किंवा मोठी बॅटरी पाहून आकर्षित होतात आणि नवीन फोन खरेदी करताता, मात्र स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला तुमच्या गरजा लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच जर तुम्हाला गेमिंग करण्यासाठी फोन पाहिजे असेल तर केवळ 200MP कॅमेरा महत्त्वाचा नाही तर तुमच्या फोनमध्ये चांगला प्रोसेसर आणि हाई रिफ्रेश रेट डिस्प्ले असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जाहिराती बघून स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा तुमची गरज पाहून स्मार्टफोन खरेदी करा.
स्मार्टफोन खरेदी करताना लोकं सहसा स्मार्टफोनच्या आगामी सॉफ्टवेअर अपडेटकडे दुर्लक्ष करतात. मिड रेंज किंवा बजेट स्मार्टफोन लवकर जुने होतात, म्हणजेच अशा स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट लवकर बंद होतात. अशा परिस्थितीत, ब्रँडचा अपडेट ट्रॅक रेकॉर्ड पाहणे आणि फोनची पुनर्विक्री किंमत काय असेल याचा विचार करणे चांगले होईल.
फेस्टिव सीजनची क्रेझ इतकी असते की लोकं ईएमआय आणि क्रेडिट कार्ड ऑफर्सच्या नादात त्यांच्या बजेटपेक्षा जास्त खर्च करतात. यामुळे नंतर आर्थिक भार वाढतो. लक्षात ठेवा, प्रत्येक किंमत श्रेणीत चांगले पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्हाला सर्वात महागडा फोन खरेदी करावा लागणार नाही. दिवाळी आणि धनत्रयोदशीला स्मार्टफोन खरेदी करणे निश्चितच शुभ आहे, परंतु घाईघाईने चुकीचा निर्णय घेणे तुमच्या खिशासाठी महागात पडू शकते.