अमेरिकेने या देशांमध्ये न जाण्याचा दिला सल्ला
सध्याचे बांगलादेशमधील बदलते वातावरण बघता अमेरिकने नुकतीच एक नवीन ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली आहे. या ट्रॅव्हल ॲडव्हायझरीमध्ये अमेरिकन सरकारने नागरिकांना बांगलादेशसह अनेक देशांमध्ये जाण्यास प्रतिबंध केले आहे. सरकारने नागरिकांना या देशांमध्ये जाणे टाळावे असा सल्ला दिला आहे. सुरक्षेचे कारण आणि जागतिक घडामोडी लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजले आहे. तर या ॲडव्हायझरीमध्ये भारतातील दोन जागांचाही समावेश करण्यात आला आहे. बांगलादेश, भारतासह कोणकोणत्या देशांचा या यादीत समावेश आहे ते जाणून घेऊयात.
अमेरिकेने आपल्या नागरिकांना बांगलादेशमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच अमेरिकन नागरिकांना संकट काळात मदत करणाऱ्या त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान बांग्लादेशमध्ये खराब होत असलेले वातावरण बघता सुरक्षेच्या करणास्तव हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. सध्या रशियामध्ये राहत असणाऱ्या प्रत्येक अमेरिकन नागरिकांनी तात्काळ देश सोडावा असे आदेश अमेरिकन सरकारने केले आहेत. त्याचबरोबर जे लोक रशियाला जाण्याचा विचार करत आहेत, त्यांनीही आपला हा प्लॅन रद्द करावा असे सल्ला देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा – Wish Fulfilling Lake: भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे इच्छा पूर्ण करणारा जादुई तलाव! इथे कसे जायचे? जाणून घ्या
दहशतवाद, नागरी अशांतता, अपहरण किंवा ओलीस ठेवणे आणि सशस्त्र संघर्षाच्या जोखमीमुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना सीरियामध्ये प्रवास करण्यास मनाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याच्या धोक्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतातील काही भागांत जाण्यास मनाई केली आहे. यात मणिपूर, जम्मू-काश्मीर, भारत-पाकिस्तान सीमा आणि देशाच्या मध्य आणि पूर्व भागात प्रवास न करण्याचा सल्ला दिला जात आहे. दहशतवाद आणि नागरी अशांततेमुळे या भागांत प्रवास करू नका असे ट्रॅव्हल ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.
या सर्व देशांसह लेबनॉन आणि उत्तर इस्रायल, गाझा, उत्तर कोरिया, येमेन, अफगाणिस्तान, इराक, इराण, युक्रेन, बेलारूस, मेक्सिको, व्हेनेझुएला या देशांमध्येही जाण्यास अमेरिकेने आपल्या नागरिकांना अलर्ट जारी केला आहे. सुरक्षिततेच्या करणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.