शिमला-मनाली विसरा, फक्त 2000 रुपयांत करा हिमाचल प्रदेशच्या या 5 ठिकाणांची सैर
सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे. या थंडगार वातावरणात अनेक ट्रॅव्हल प्रेमी कोणत्या ना कोणत्या हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन करत असतात. या दिवसांत थंड हवेच्या ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच बहरून येते. अशात याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक अशा ठिकाणांना भेट देत असतात. मात्र हिल स्टेशन्सना भेट देणे जरा खर्चिकही ठरू शकते ज्यामुळे अनेक लोक बजेटच्या कमतरतेमुळे अशा ठिकाणांना भेट देणे टाळतात. म्हणूनच आता आम्ही तुमच्यासाठी थंड हवेची अशी काही ठिकाणे घेऊन आलो आहोत जिथे तुम्हाला कमी पैशात संस्मरणीय ट्रिपचा आनंद लुटता येईल.
हिल स्टेशन म्हटलं की अनेकांच्या मनात शिमला-मनाली ही नाव येतात. तथापि, शिमला मनाली हे इतके लोकप्रिय ठिकाण आहे की येथे जवळजवळ वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. अशा परिस्थितीत शांत वातावरणात पर्वतीय सौंदर्य आणि निसर्गाचा आनंद घेता येत नाही. याशिवाय इतर पर्यटन स्थळांच्या तुलनेत या ठिकाणी जाण्याचा खर्चही महाग आहे. पण शिमला-मनालीसारखी दृश्येही कमी पैशात आणि शांत वातावरणात पाहता येतात. हिमाचल प्रदेशमध्ये अशी अनेक ऑफबीट ठिकाणे आहेत, ज्यांना तुम्ही फक्त 2000 रुपयांत भेट देऊ शकता आणि तेथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटू शकता.
धर्मकोट
या लिस्टमधील सर्वात पहिले ठिकाण म्हणजे धर्मकोट. हे ठिकाण हिमाचल प्रदेशातील धरमकोट सर्वात शांत आणि ध्यानाचे केंद्र मानले जाते. धरमकोटला जाण्यासाठी मॅक्लॉडगंजपर्यंत बस मिळेल. तेथून गंतव्यस्थानावर पोहचण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा शॉर्ट ट्रेकिंगचा पर्याय निवडू शकता. येथे प्रति व्यक्ती प्रतिदिन खर्च सुमारे 500 ते 1500 रुपये इतका खर्च असू शकतो. धरमकोटमध्ये भेट देण्यासाठी ध्यान केंद्रे, सुंदर कॅफे आणि धौलाधर पर्वतश्रेणीची प्रेक्षणीय दृश्ये आहेत.
शानगढ
हिरव्यागार मैदानांमध्ये शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही हिमाचल प्रदेशच्या शानगडला भेट देऊ शकता. येथे जाण्यासाठी दिल्लीहून रात्रीची बस पकडावी लागेल. नंतर टॅक्सी किंवा लोकल बसने तुम्हाला शानगढला जात येईल. शानगढचा प्रवास खर्च प्रतिदिन 1000 ते 2000 रुपये इतका असेल. हिरवाईने आच्छादलेले पर्वत, पारंपारिक हिमाचली घरे, निर्जन वातावरणाचा आनंद या हिल स्टेशनवर घेता येतो.
चितकुल
चितकुल हे हिमाचल प्रदेशमधील एक सुंदर आणि निसर्गसौंदर्याने नटलेले गाव आहे. या ठिकाणाला भारतातील शेवटचे गाव म्हटले जाते. चितकुलला जाण्यासाठी शिमला ते सांगला अशी बस किंवा टॅक्सी मिळेल. येथून तुम्ही चित्कुलला जाऊ शकता. येथे रोजचा खर्च सुमारे 800 ते 1500 रुपये असू शकतो.
चितकुलमध्ये, पारंपारिक लाकडी घरे, नदीकाठचे शांत दृश्य आणि पर्वतीय जीवनशैली जवळून पाहता येते.
शोजा
जर तुम्हाला धबधबे आणि जंगलांमध्ये शांतता अनुभवायची असेल तर तुम्ही तुमच्या ट्रिपसाठी शोजाची निवड करू शकता. भुंतर ते बारशैनी असा ट्रेक करून शोजाला पोहोचता येते. शोजाचा प्रवास खर्चही दोन हजार रुपयांच्या आत येऊ शकतो. हिमाचलमधील या ठिकाणी, पर्वतांवरून सुंदर धबधबे, घनदाट जंगले आणि डोळ्यात टिपणारा सूर्यास्त पाहता येतो.
प्राजक्ता कोळी कर्जत येथे करणार डेस्टिनेशन वेडिंग, फिरण्यासाठीचे परफेक्ट ठिकाण, मुंबईहून कसे जायचे?
काजा
हिमाचल प्रदेशातील काझा येथे तिबेटी संस्कृती आणि मठ यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. काझाला भेट देण्यासाठी, बसने रेकॉन्ग पीओला पोहोचता येते. पुढील प्रवास टॅक्सी किंवा बसने करता येईल. या अनोख्या पर्यटन स्थळावर एक दिवस घालवण्याचा खर्च सुमारे 1000 ते 2000 रुपये असेल. येथे प्राचीन मठ, अनोखी तिबेटी संस्कृती, स्पिती व्हॅलीचे सौंदर्य जवळून पाहता येते.