मांजापासून रक्षणासाठी शिक्षकाची अनोखी शक्कल; विद्यार्थ्यांनीही साथ देत घेतली ही शपथ
संक्रात सण जस जसा जवळ येऊ लागला तसे राज्यसह देशभरात पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा अनेक ठिकाणी चायना मांजा वापरला जातो. त्यामुळे पशु,पक्षी, मानवी जीवाला देखील त्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी देखील नायलॉन/चायना मांजा वापरणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देत काही विक्रेतांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. चायना मांजा वापरू नये ही जनजागृती करण्यासाठी अहिल्यानगर शहरातील शाळा देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.अहिल्यानगर शहरातील केशवराव गाडीलकर शाळेचे मुख्याध्यापक अनिल गायकवाड यांनी नायलॉन/चायना मांजापासून बचाव होण्यासाठी मोटारसायकलला मांजारक्षक लावलं आहे.एक वर्षांपूर्वी नायलॉन मांजामुळे ते स्वतः जखमी झाल्याने यावर्षी या मांजामुळे कोणीही जखमी होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या मोटारसायकल वरती चायना मांजा रक्षक बनवून घेतलं आहे.हे रक्षक बनविण्यासाठी केवळ तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च येतो.या चायना मांजा रक्षकची माहिती त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थीनीं व विद्यार्थ्यांना दिली.शाळेतील विद्यार्थ्यांसह परिसरातील मुलांनी हा नायलॉन मांजा पतंग उडविण्यासाठी वापरू नये याची देखील शपथ यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली.