अद्भुत! मच्छिमारांना पहिल्यांदाच पाण्यात सापडली केशरी रंगाची शार्क! सफेद डोळे, लहान शरीर अन् दुर्मिळ दृश्य कॅमेरात कैद
सोशल मीडियावर सध्या एका दुर्मिळ शार्क माशाचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. समुद्री जगात शार्क माशा म्हणजे पाण्याचा खलनायकचं… लहान मोठ्या सर्वच माशांची तो शिकार करतो. त्याचा आकार विशाल तर रंग राखाडी अन् त्यात हलका पांढरा असा असतो पण नुकतेच शार्क माशाचे एक अनोखे दृश्य इंटरनेटवर व्हायरल झाले आहे ज्यात शार्क माशा एका वेगळ्या म्हणजेच गडद केशरी रंगात दिसून आला आहे. आजवर कुणीही शार्क माशाचे असे रूप कधी पाहिले नाही का ऐकलेही नाही ज्यामुळे हे दृश्य शेअर होताच ते सोशल मीडियावर वाऱ्याच्या गतीने व्हायरल झाले.
केशरी रंगाची शार्क…
समुद्र हे फार खोल आहे आणि समुद्राच्या आतील बराच भाग मानवापासून लपलेला आहे. हा अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्याला समुद्री जीव आणि त्यातील रहस्य नव्याने शिकण्याची आणि जाणून घेण्याची संधी मिळते. आता हेच पाहा ना कुणी स्वप्नातही शार्क माशाचे हे रूप कधी पाहिले नसेल पण अचानक भेटलेल्या या माशाने सर्वांच्याच लक्ष याकडे वेधून घेतले आहे. फोटोत आपण पाहू शकता यात शार्क माशाचा आकार जरा लहान, केशरी रंग आणि सफेद डोळे दिसून येत आहे. त्याचे हे रूप सर्वांनाच थक्क करणारे आहे.
तज्ञांच्या मते, या शार्कचा असामान्य रंग आणि डोळे हे एका दुर्मिळ अनुवांशिक स्थितीचे परिणाम आहेत. प्रत्यक्षात, या शार्कमध्ये झँथिझम आणि अल्बिनिझम या दोन वेगवेगळ्या स्थितींची लक्षणे आढळून आली. झँथिझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात जास्त पिवळे रंगद्रव्य तयार होते. यामुळे प्राण्यांचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी दिसतो. ही स्थिती काही मासे, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये दिसून येते. परंतु शार्कमध्ये ती शोधणे जवळजवळ अशक्य मानले जाते. म्हणूनच हा शोध वैज्ञानिक समुदायासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. मच्छिमारांना ही चमत्कारिक शार्क भेटली आहे जी पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.ही केशरी शार्क केवळ मच्छीमारांसाठी आयुष्यभराचा अनुभव नाही तर विज्ञानासाठी एक उत्तम शोध आहे.
केशरी माशाची ही पोस्ट @AFpost नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे सुंदर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती मोठ्या गोल्ड फिश सारखी दिसते आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे, शार्क नारंगी नसतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.